नवी दिल्ली : सत्तारूढ भाजपला व्यक्ती, काही विश्वास्त संस्था आणि बड्या कंपन्यांकडून २०१९-२० या कालावधीत ७८५ कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या देणग्या मिळाल्या आहेत. ही रक्कम काँग्रेसला याच कालावधीत मिळालेल्या रकमेपेक्षा पाच पटीने अधिक आहे.

फेब्रुवारी महिन्यात भाजपने निवडणूक आयोगाकडे (ईसी) देणग्यांबाबतचा अहवाल सादर केला ती माहिती ईसीने जाहीर केली आहे. भाजपला देणग्या देणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने काही विश्वास्थ संस्था, व्यक्ती आणि बड्या कंपन्यांसह पक्षाच्या नेत्यांचा समावेश आहे. पीयूष गोयल, पेमा खंडू, किरण खेर आणि रमणसिंह या नेत्यांचा त्यामध्ये समावेश आहे.

आयटीसी, कल्याण ज्वेलर्स, अंबुजा सीमेंट, लोढा डेव्हलपर्स आणि मोतिलाल ओसवाल आदींचा बड्या कंपन्यांमध्ये समावेश आहे. त्याचप्रमाणे न्यू डेमोक्र्रटिक इलेक्टोरल ट्रस्ट, प्रुडण्ट इलेक्टोरल ट्रस्ट, जनकल्याण इलेक्टोरल ट्रस्ट आणि ट्रम्फ इलेक्टोरल ट्रस्ट यांनीही भाजपला देणग्या दिल्या आहेत.

दरम्यान, काँग्रेसला १३९ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत तर तृणमूल काँग्रेसला आठ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत.