राम माधव यांचे वैयक्तिक मत असल्याचे स्पष्टीकरण
भारत आणि पाकिस्तान ही दोन सार्वभौम राष्ट्रे असल्याचे सांगत भाजपने सचिव राम माधव यांच्या वक्तव्यांपासून पक्षाला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. अखंड भारताबद्दलचे वक्तव्य हे त्यांचे स्वतचे मत असून ते व्यक्त करण्याचा त्यांना अधिकार आहे, अशा शब्दांत पक्षाचे प्रवक्ते एम. जे. अकबर यांनी त्या संदर्भातील प्रश्न झटकून टाकले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भारत, पाकिस्तान व बांगलादेश असे अखंड भारताचे स्वप्न युद्धाने नव्हे, तर लोकेच्छेने साकार होईल, अशा आशयाचे वक्तव्य माधव यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले होते. त्यासंदर्भात पत्रकारांनी अकबर यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. यावेळी १९९९मध्ये लाहोर दौऱ्यावर गेलेल्या माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वक्तव्यांचे स्मरण त्यांनी पत्रकारांना करून दिले. भारत व पाकिस्तान यांनी सार्वभौम राष्ट्रांप्रमाणे एकमेकांशी व्यवहार करावेत, असे त्यावेळी म्हणणाऱ्या वाजपेयींचे वक्तव्य वस्तुस्थिती असल्याचे अकबर यांनी सांगितले. अशा परिस्थितीत माधव यांच्यासारखा महत्त्वाचा सचिव अखंड भारताबाबतचे विधान कसे काय करू शकतो, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, माधव यांना स्वतची मते मांडण्याचा अधिकार आहे.

..भाजपला हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करून घ्यावी लागेल
‘अखंड भारत’ ही चांगली संकल्पना असून ती प्रत्यक्षात आली पाहिजे; परंतु भाजपला भारतातील अल्पसंख्याकांचा त्रास होतो. राम माधव यांची विचारप्रक्रिया चांगली असली तरी प्रत्यक्षात भाजप मात्र वेगळेच करतो आहे. त्यासाठी आपल्या वाचाळ नेत्यांना थांबविणे गरजेचे आहे. अखंड भारत साकार करण्यासाठी हृदय मोठे असणे गरजेचे आहे. त्यासाठी भाजपला हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करून घ्यावी लागेल, असा खोचक टोमणा काँग्रेसने भाजपला मारला. काँग्रेसचे प्रवक्ते टॉम वडक्कन म्हणाले की, पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या वाढदिवसाला गेले म्हणजे असहिष्णुतेचे धोरण सोडले असे होत नाही. त्यासाठी शब्दकोशातून असहिष्णुतेला हद्दपार केले पाहिजे. ‘अखंड भारत’ ही चांगली कल्पना आहे, पण माधव भविष्याबद्दल बोलत आहेत. प्रत्यक्षात अर्थव्यवस्थेची स्थिती वाईट आहे.