भाजपाने अशा एका कंपनीकडून निवडणूक देणगी घेतली आहे ज्यांच्याविरोधात दहशतवाद्यांना फंडिंग केल्याप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) तपास सुरु आहे. भाजपाने निवडणूक आयोगाला निवडणुकीच्या देणगींसंदर्भात दिलेल्या माहितीत हे उघड झालं आहे. यानुसार, २०१४-१५ मध्ये आरकेडब्ल्यू डेव्हलपर्स लिमिटेडकडून १० कोटींची देगणी घेतली आहे.

भाजपाला ही देणगी मुंबईमधील अॅक्सिस बँकेच्या वांद्रे शाखेच्या माध्यमातून वितरित करण्यात आली आहे. भाजपाकडून निवडणूक आयोगाला देणगींसंबंधी जी माहिती देण्यात आली आहे, त्यामध्ये देणगी देणाऱ्यांच्या यादीत आरकेडब्ल्यू डेव्हलपर्स लिमिटेडचं नाव २६ व्या स्थानावर आहे. या यादीत सत्या इलेक्टोरल ट्रस्ट, प्रूडेंट इलेक्टोरल ट्रस्ट, जनता निर्वाचक इलेक्टोरल ट्रस्ट अशा अनेक नावांचा समावेश आहे.

निवडणूक देणगी देणाऱ्यांची संपूर्ण यादी तुम्ही या लिंकवर पाहू शकता: https://myneta.info/party/index.php?action=all_donors&id=3

एचडीआयएलचे मालक धीरज वाधवान आरकेडब्ल्यू डेव्हलपर्स कंपनीचे प्रवर्तक आहेत. एचडीआयएलविरोधात पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणीदेखील चौकशी सुरु आहे. याप्रकरणी वाधवान कुटुंबातील दोन सदस्य अटकही झाले आहेत. आरकेडब्ल्यू डेव्हलपर्सचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा सहकारी इक्बाल मिर्चीच्या कंपनीसोबत असणाऱ्या संबंधांचाही तपास सुरु आहे.

आरकेडब्ल्यू डेव्हलपर्सने दाऊद गँगशी संबंधित कंपनीसोबत करोडो रुपयांचा कथित व्यवहार केला आहे. आरकेडब्ल्यू डेव्हलपर्सचे माजी संचालक रणजीत बिंद्रा यांना ईडीकडून अंडरवर्ल्डशी व्यवहार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. बिंद्रा यांच्यावर दहशतवाद्यांना फंडिंग केल्याचाही आरोप आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रणजीत बिंद्रा इक्बाल मिर्ची आणि कंपनीमधील व्यवहारांमध्ये मध्यस्थी करण्याची भूमिका निभावत होते. भाजपाला निवडणूक देणगी देणाऱ्या कंपनीवर १९९३ बॉम्बस्फोटातील आरोपी इक्बाल मिर्चीची संपत्ती खरेदी करण्याचाही आरोप आहे. ईडीचा आरोप आहे की, आरकेडब्ल्यू डेव्हलपर्सने इक्बाल मिर्चीची संपत्ती विकण्यातही मदत केली होती. आरकेडब्ल्यू सोबत करण्यात आलेल्या व्यवहार प्रकरणी ईडीने याआधी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांची चौकशी केली आहे.