राष्ट्रीय राजकारणात आता काँग्रेसचे कोणतेही स्थान उरलेले नाही. मात्र, केवळ भाजपच्या चुकांमुळेच काँग्रेस अजूनपर्यंत जिवंत असल्याची टीका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली. एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत केजरीवाल यांनी म्हटले की, काँग्रेसकडून लोकांना आता कोणतीही आशा उरलेली नाही. भविष्यात काँग्रेसला जी काही मते मिळतील ती फक्त भाजपच्या घोडचुकांमुळेच मिळतील. कदाचित भाजपच काँग्रेसचे भविष्य घडवेल. अन्यथा माझ्या मते काँग्रेसला काहीच भविष्य नाही, असे केजरीवाल यांनी सांगितले. यावेळी केजरीवाल यांनी भाजप आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली. मात्र, सध्यातरी मला कोणतीही मोठी राजकीय महत्वकांक्षा नसल्याचे त्यांनी सांगितले. भाजपसाठी विकास हा केवळ निवडणुकीच्या घोषणेचा भाग होता. आर्थिक विकासाबाबत भाजप कधीच गंभीर नव्हता आणि नाही, असेही केजरीवालांनी यावेळी म्हटले.