24 February 2021

News Flash

‘व्हॅलेंटाईन डे’ला तोडफोड : भाजपाच्या माजी आमदारासह १७ जणांना अटक

शिवसेना कार्यकर्त्यांचाही समावेश

‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली लव जिहादला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप करत रेस्टॉरंट आणि हुक्का बारची तोडफोड केल्याप्रकरणी भाजपाच्या माजी आमदारासह १७ जणांना अटक करण्यात आली आहे. भोपाळ शहरात व्हॅलेंटाईन डे अर्थात १४ फेब्रुवारी रोजी तोडफोड करण्यात आल्याच्या दोन घटना घडल्या होत्या.

पोलिसांकडे करण्यात आलेल्या तक्रारीच्या आधारावर तोडफोड करणाऱ्या आरोपींची ओळख पटवण्यात आली. त्यानंतर माजी आमदार सुरेंद्र नाथ सिंग यांच्यासह १७ जणांना अटक करण्यात आली, अशी माहिती भोपाळचे पोलीस महासंचालक इर्शाद वाली यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना दिली.

तोडफोड करणारे आरोपी भारतीय जनता युवा मोर्चा आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत. रविवारी आरोपींनी भगवे झेंडे फडकवत आणि जय श्रीराम अशा घोषणा देत तोडफोड केली. पहिल्या घटनेत कार्यकर्त्यांनी भोपाळमधील श्यामला हिल्स परिसरात असलेल्या जंकयार्ड कॅफेला लक्ष्य केलं. हॉकी स्टीक आणि बॅट घेऊन आरोपींनी कॅफेत जाऊन गोंधळ घातला. कॅफेतील ग्राहकांशी गैरवर्तन केलं.

याप्रकरणी कॅफेचे मॅनेजर नरेंद्र कुमार यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. १२.२० वाजता आठ जणांच्या गटाने येऊन कॅफेत गोंधळ घातला, शिवीगाळ करत तोडफोड केली, असं तक्रारीत म्हटलं आहे. “तुम्ही लोक लव जिहादला प्रोत्साहन देत आहात. हा फक्त ट्रेलर आहे. तुम्ही लोक पुन्हा कॅफेत दिसलात, तर जीव घेऊ,” अशी धमकी आरोपींनी दिल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.

याचदरम्यान, १० जणांच्या गटाने बिट्टन मार्केटजवळ असलेल्या कॉऊबाय रेस्ट्रो बारमध्ये तोडफोड केली. यात तीन महिलांचाही समावेश होता. राहुल यादव नावाच्या व्यक्तीने याप्रकरणी तक्रार दिली आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते असल्याचं सांगत गटाने ग्राहकांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी बारमधील सामनाची तोडफोड केली, असं तक्रारीत म्हटलं आहे. दोन्ही तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता. यात अनेकांनी ते माजी आमदार सुरेंद्र नाथ सिंग यांच्यासाठी काम करत असल्याचं सांगितलं. पोलिसांनी दोन्ही घटनांमध्ये सिंग यांच्यासह १७ जणांना अटक केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2021 8:46 am

Web Title: bjp ex mla among 17 held for valentines day attacks bmh 90
Next Stories
1 मोदींचा फोटो आणि भगवद्गीतेची प्रत अंतराळात पाठवणार
2 शाह यांची नेपाळ आणि श्रीलंकेतही सरकार स्थापन करण्याची योजना; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा दावा
3 …अन् भाषण सुरु असतानाच गुजरातचे मुख्यमंत्री स्टेजवर कोसळले
Just Now!
X