राजस्थानमधील झालावर जिल्ह्यातील अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने मनोहरथाना येथील माजी आमदार असणारे भाजपा नेते कंवरलाल मीणा यांना तीन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. माजी आमदाराने अकलेरामधील तत्कालीन उपविभागीय दंडाधिकारी रामनिवास मेहता यांच्यावर रिव्हॉलव्हर रोखून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणामध्ये ही शिक्षा सुनावण्यात आलीय. अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निकाल बदलत माजी आमदाराला या प्रकरणात दोषी ठरवलं. सरकारी अधिकाऱ्यावर रिव्हॉल्व्हर रोखून धरल्याचं हे प्रकरण १५ वर्ष जुनं असून या घटनेनंतर आमदाराला अटक करण्यात आली होती.

समोर आलेल्या माहितीनुसार मनोहरथाना विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार असणाऱ्या कंवरलाल मीणा यांचा २००५ साली तत्कालीन उपविभागीय दंडाधिकारी रामनिवास मेहता यांच्यासोबत वाद झाला. वादावाददरम्यानच मीणा यांनी रिव्हॉल्व्हर काढून मेहता यांच्यावर रोखली. मीणा यांनी मेहता यांना जीवे मारण्याची धमकीही दिली. या प्रकरणामध्ये मनोहरथानाच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी प्रकरणामधील शक्यतांचा विचार करता २०१८ साली मीणा यांनी निर्दोष मुक्तता केली. या निर्णयाविरोधात सकारी वकील असणाऱ्या अकलेरा यांनी अतिरिक्त जिल्हा न्यायालयामध्ये याचिका दाखल करत निकालाला आवाहन दिलं.

अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने या प्रकरणामध्ये सोमवारी आपला निकाल दिला. अतिरिक्त जिल्हा न्यायाधिश असमी कुलश्रेष्ठ यांनी उपलद्ध साक्षीदार, नोंदवण्यात आलेले जबाब यांच्या आधारे माजी आमदाराला दोषी ठरवलं. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दोन वर्षांचा तुरुंगवास आणि दंड तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल तीन पीडीपीपी अॅक्ट अंतर्गत एकूण तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.

अतिरिक्त जिल्हा न्यायालयाच्या या निकालानंतर मीणा यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना जिल्हा रुग्णालयामध्ये नेऊन त्यांची करोना चाचणी करुन त्यांची तुरुंगामध्ये रवानगी करण्यात येणार आहे. मीणा हे एकदाच आमदार म्हणून निवडून आले होते.