उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे अधिवेशन उद्यापासून येथे सुरू होत आहे, त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा तसेच इतर नेते उपस्थित राहणार आहेत. त्यानिमित्ताने शहरात कडक सुरक्षाही ठेवण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्री, भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री, खासदार अधिवेशनास उपस्थित राहणार असून त्यात उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतील प्रचाराचे विषय ठरवले जाण्याची शक्यता आहे.
उत्तर प्रदेशातील निवडणुका वर्षांहून कमी काळात होणार आहेत. अलाहाबाद हे भारतीय राजकारणाचे प्रमुख केंद्र राहिले असून जवाहरलाल नेहरू ते व्ही.पी.सिंग यांच्यापर्यंत अनेकांनी राजकारणाचे धडे येथे गिरवले. त्यामुळे उत्तर प्रदेशात राजकीय बदल घडवण्यासाठी अलाहाबाद येथे कार्यकारिणीचे अधिवेशन घेतले जात आहे, असे भाजपचे सरचिटणीस सिद्धार्थनाथ सिंग यांनी सांगितले. सिंग हे गुरुवारपासून येथे उपस्थित आहेत. भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी अलीकडेच एका सभेत सांगितले होते की, भाजपला संसदेत बहुमत मिळवून देण्यासाठी उत्तर प्रदेशचा मोठा वाटा आहे. पक्षाचे उपाध्यक्ष व राज्याचे प्रभारी ओम माथूर यांनी सांगितले की, राष्ट्रीय कार्यकारिणीत अनेक विषयांवर चर्चा होईल पण मुख्य भर हा उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांवर राहील. अलाहाबाद येथे अधिवेशन होत असल्याने मोदी व इतर नेत्यांच्या स्वागताचे फलक रस्त्यांवर लागले आहेत.
अधिवेशनानंतर सोमवारी सभा होणार असून त्यासाठी लोकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
सर्मा, बहुगुणा कार्यकारिणीवर
आसाममध्ये भाजपच्या विजयात मोलाचा वाटा उचलणारे हेमंत विश्वसर्मा व उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांचा पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे. याखेरीज ओडिशाचे माजी मुख्यमंत्री व आदिवासी नेते गिरीधर गमांग तसेच उत्तर प्रदेशचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत वाजपेयी, कर्नाटकचे प्रल्हाद जोशी व केरळचे व्ही. मुरलीधरन तसेच मणिपूरचे चोबा सिंह यांचाही राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे.