गुजरातमध्ये पाटीदार समुदायाने ओबीसी संवर्गात समावेश करण्यासाठी सुरू केलेल्या आंदोलनामुळे भारतीय जनता पक्षामध्ये अस्वस्थता पसरली आहे. राज्य सरकारला आंदोलकांना समजावता न आल्याने खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाजपाध्यक्ष अमित शहा यांना गुजरातचा दौरा करण्याची सूचना केली आहे. मोदी यांच्या सूचनेवरून शहा पुढील आठवडय़ात पाटीदार समुदायातील नेत्यांची गांधीनगरला जाऊन भेट घेतील. मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी आंदोलनकर्त्यांच्या भीतीने ५ ऑगस्टला होणारा राजकोटचा दौरा रद्द केला होता. त्यानंतरच नरेंद्र मोदी यांनी शहा यांना सूचना केल्याचा दावा पक्षसूत्रांनी केला.
ओबीसी आरक्षणासाठी पाटीदार समुदायाने येत्या २५ ऑगस्ट रोजी अहमदाबाद येथे मोर्चा आयोजित केला आहे. त्यात किमान २५ लाख आरक्षण समर्थक सहभागी होण्याची शक्यता आहे. पाटीदार यांच्याप्रमाणे गुर्जर, जाट समुदायाची आरक्षणाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. पाटीदार आंदोलनाचे लोण पसरल्यास जाट व गुर्जर समुदाय मागणी पुढे रेटून हरयाणा व राजस्थान सरकारला अडचणीत आणण्याची भीती भाजप नेत्यांना आहे. या दोन्ही राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहे.
भाजपला साथ
गुजरातमध्ये एकूण लोकसंख्येच्या पंधरा टक्के असलेल्या पाटीदार समुदायाने सदैव भाजपला साथ दिली आहे. त्यामुळे मोदी यांनी या प्रकरणी लक्ष घातले आहे. कोणत्याही ठोस आश्वासनाशिवाय राज्य सरकारशी चर्चा करणार नसल्याची अट आंदोलनकर्त्यांनी ठेवल्याने सरतेशेवटी अमित शहा यांनी या प्रकरणी लक्ष घातले आहे.