तृणमूल काँग्रेसची भाजपवर टीका; हिंसाचारावरून राजकारण
पश्चिम बंगालमधील हिंसाचारग्रस्त कालियाचकला भेट देण्यास भाजपच्या तीन सदस्यीय समितीला सोमवारी जिल्हा प्रशासनाने मज्जाव केला. त्यामुळे या समितीला रेल्वे स्थानकातूनच परतावे लागल्याने भाजप आणि सत्तारूढ तृणमूल काँग्रेसमध्ये शाब्दिक युद्ध पेटले आहे.
खासदार भूपेंद्र यादव, रामविलास वेदांती आणि एस. एस. अहलुवालिया हे गौर एक्स्प्रेसमधून माल्दा शहर स्थानकांत सकाळी ६ वाजता उतरले, मात्र कालियाचकमध्ये प्रतिबंधात्मक आदेश जारी असल्याने या समितीला पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने परत जाण्याचे आदेश दिले.पश्चिम बंगाल सरकारची ही कृती निषेधार्ह असल्याचे यादव म्हणाले. खासदारांना हावडाला जाणाऱ्या शताब्दी एक्स्प्रेसने माघारी परतणे भाग पडले. या प्रकरणी आपण केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेऊन चौकशीची मागणी करणार आहोत. इतकेच नव्हे तर राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचीही भेट घेणार आहोत, असेही यादव म्हणाले.
दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या असल्याने भाजप या प्रकरणाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न करीत असून मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, मात्र बिहारपेक्षाही भाजपला पश्चिम बंगालमध्ये अधिक मोठा फटका बसेल, असे सत्तारूढ तृणमूल काँग्रेसने म्हटले आहे.
हिंदुत्ववादी नेत्याच्या वक्तव्यावरून कालियाचकमध्ये गेल्या महिन्यांत हिंसाचाराचा उद्रेक झाला होता. निदर्शकांनी पोलीस ठाण्याला आग लावून वाहनांची मोडतोड केली होती.
माकपलाही मज्जाव
भाजपच्या सत्यशोधन समितीला प्रवेशास मज्जाव करण्यात आल्यानंतर माकपच्या शिष्टमंडळालाही  भेट देण्यास मज्जाव करण्यात आला.