पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी जवानांदरम्यान झालेल्या संघर्षानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव आहे. भारताचे २० जवान शहीद झाल्यानंतर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली असून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ‘भाजपा जेव्हा देशहिताशी तडजोड करते, जेव्हा देशाच्या अखंडतेवर हल्ला होतो, त्या प्रत्येकवेळी चीनशी लढण्याऐवजी काँग्रेसशी लढते’, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी केली आहे.

“भाजपा जेव्हा देशहितासोबत तडजोड करते, जेव्हा देशाच्या अखंडतेवर हल्ला होतो, त्या प्रत्येकवेळी चीनशी लढण्याऐवजी काँग्रेसशी लढण्याचा प्रयत्न करते. त्यांनी असे निंदनिय प्रयत्न करुन देशाची दिशाभूल करु नये. त्यापेक्षा सैनिकांना निशस्त्र का पाठवलं, किती जमिन चीनच्या ताब्यात आहे , दोन्ही देशाच्या सैनिकांमध्ये संघर्ष कसा झाला , गुप्तचर यंत्रणा का फेल ठरल्या” या प्रश्नांची उत्तरं द्यावी असे सुरजेवाला म्हणालेत. तसेच, ‘देशाची दिशाभूल करण्यापेक्षा आता पुढे काय कारवाई करणार हे देखील भाजपाने सांगावे’, अशी मागणी सुरजेवाला यांनी केली आहे.


यापूर्वी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही गलवान खोऱ्यातील घटनेवरून पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला. राहुल गांधी यांनी एका व्हिडिओ ट्विटद्वारे, निशस्त्र जवानांना शहीद होण्यासाठी सरकारने का पाठवले असा सवाल करतानाच आमच्या जवानांची हत्या करण्याची चीनची हिंमतच कशी झाली अशी विचारणा केली आहे. चीनने निशस्त्र भारतीय जवानांची हत्या करून एक मोठा गुन्हा केला आहे. या वीरांना कोणतेही शस्त्र न घेता धोका असलेल्या ठिकाणी कोणी पाठवले आणि का पाठवले?, याला कोण जबाबदार आहे, असे सवाल राहुल गांधी यांनी विचारलेत.