शीव, गुरूनानक, बुद्ध, इस्लाम आणि महावीर यांच्या प्रतिमांमध्ये काँग्रेसचे निवडणूक चिन्ह असलेला ‘हात’ दिसत असल्याचे कथित वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. काँग्रेसने ११ जानेवारी रोजी दिल्लीत आयोजित केलेल्या जनवेदना संमेलनात हे वादग्रस्त वक्तव्य केले होते, असा आरोप भाजपने केला आहे. राहुल गांधी यांनी केलेले वक्तव्य हे निवडणूक आचारसंहितेचेच उल्लंघन नाही तर, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचेही उल्लंघन केले आहे, असे भाजपचे म्हणणे आहे.

राहुल गांधी यांनी धर्माशी संबंधित वक्तव्य करत, काँग्रेसचे निवडणूक चिन्ह असलेला ‘हात’ शीव, गुरुनानक, बुद्ध, इस्लाम आणि महावीर यांच्या प्रतिमांमध्ये दिसत असल्याचे वक्तव्य या संमेलनात केले होते, असे भाजपने निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. राहुल गांधी यांनी निवडणूक आचारसंहिता आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या यासंबंधीच्या आदेशाचेही उल्लंघन केले आहे, असे भाजपचे म्हणणे आहे. निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीत पुराव्यांदाखल वर्तमानपत्रे आणि वृत्तवाहिन्यांचे वृत्तही जोडले आहेत. या देवांच्या प्रतिमांकडे पाहिल्यानंतर त्यांच्यात मला काँग्रेसचे निवडणूक चिन्ह असलेला ‘हात’ दिसतो, असे राहुल गांधी म्हणाले होते, अशी तक्रार करण्यात आली आहे. काँग्रेसचे निवडणूक चिन्ह जप्त करून पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढून घेण्यात यावा, अशी मागणी भाजपने केली आहे.

राहुल गांधी यांनी हे वक्तव्य जनतेच्या धार्मिक भावनांशी जोडण्याच्या हेतूने केले आहे, असा आरोप भाजपने केला आहे. भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. तसेच राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याची सीडीही दिली आहे. राहुल यांच्याविरोधात पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्येही तक्रारी दाखल करण्यात येणार असल्याचे भाजपच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.