‘पार्टी विथ डिफरन्स’ म्हणवणाऱ्या भाजपाने सभागृहातच पॉर्न पाहताना पकडल्या गेलेल्या तीन आमदारांना पुन्हा एकदा कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे तिकिट दिले आहे. त्यामुळे भाजपावर चहूबाजूंनी टीका होत असून विरोधकांना आयता मुद्दा मिळाला आहे. भाजपाने नुकतीच सात उमेदवारांची यादी जाहीर केली त्यामध्ये हे तीन आमदार आहेत. ज्यांना २०१२ मध्ये कर्नाटक विधानसभेत पॉर्न पाहताना पकडण्यात आले होते.

कर्नाटक विधानसभेतील २२४ जागांसाठी भाजपाने २२० उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी १२ मे रोजी मतदान होणार असून १५ मे ला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार निलिनी सिंह यांनी याच मुद्यावरुन टि्वटकरुन भाजपावर निशाणा साधला आहे. पॉर्न पाहणाऱ्या आमदारांना तिकिट देणे हा मोदी-शहा जोडीचा मास्टर स्ट्रोक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

काय आहे प्रकरण
कर्नाटकात भाजपाचे सरकार असताना त्यावेळचे तत्कालिन मंत्री आणि भाजपा आमदार लक्ष्मण सावादी विधानसभेचे कामकाज सुरु असताना मोबाईलवर पॉर्न क्लिप पाहत होते. त्यावेळी तत्कालिन पर्यावरण मंत्री जे.कृष्णा पालेमर आणि महिला-बाल विकासमंत्री सीसी पाटीलही सावदी यांच्या फोनमध्ये पॉर्न पाहण्यामध्ये गुंग झाले होते. विधानसभेत त्यावेळी दुष्काळाच्या प्रश्नावर चर्चा सुरु होती. मीडियाच्या प्रतिनिधींनी हे कृत्य त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये कैद केले. या घटनेवरुन राज्यात मोठा गदारोळही झाला होता.