News Flash

नाराज शिवसेनेसाठी भाजपाकडून मोठी ऑफर; राज्यसभा उपसभापतीपद देणार?

शिवसेनेची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न

संग्रहित छायाचित्र

भाजपाप्रणित रालोआत भाजपाकडून योग्य सन्मान मिळत नसल्याच्या कारणावरून नाराज असलेल्या शिवसेनेची मनधरणी करण्यासाठी शिवसेनेला मोठी ऑफर देण्यात आल्याचे सुत्रांकडून कळते. ही ऑफर म्हणजे राज्यसभेत उपसभापतीपद देण्याबाबत चर्चा सुरु आहे.

राज्यसभेचे विद्यमान उपसभापती पी. जे. कुरियन हे निवृत्त झाले आहेत. गेल्या ४१ वर्षांपासून हे पद काँग्रेसकडे आहे. मात्र, यावेळी मोदी सरकार हे पद प्रमुख विरोधी पक्षांकडे जाऊ नये यासाठी प्रयत्नशील आहे. इकॉनॉमिक्स टाइम्सच्या वृत्तानुसार, शिवसेनेचा अद्याप या ऑफरवर विचार सुरु असून याबाबत त्यांनी अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही.

भाजपाने शिवसेनेला ही ऑफर तेव्हा दिली आहे जेव्हा या दोघांमधील संबंध नाजूक स्थितीत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नव्या राजकीय समिकरणाच्या शोधात असून त्यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचीही नुकतीच भेट घेतली होती. शिवसेनेच्या मुखपत्रातून वारंवार मोदी सरकार आणि एकूणच भाजपाच्या कारभारावर वारंवार कठोर शब्दांत टीका करण्यात आली आहे. त्यामुळे भाजपापासून हा मित्रपक्ष दुरावण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपाने ही नवी खेळी केली आहे. मात्र, शिवसेनेने जर ही ऑफर स्विकारली नाही तर हे पद भाजपा स्वतः जवळ ठेवणार आहे. त्यासाठी भाजपाच्या भुपेंद्र यादव यांचे नावही आघाडीवर आहे.

शिवसेना जर भाजपाच्या या ऑफरवर विचार करीत असेल तर त्यांच्यासाठी राज्यसभेच्या उपसभापतीपदाचा उमेदवार निवडणे मोठे आव्हानात्मक असणार आहे. कारण, राज्यसभेत संजय राऊत शिवसेनेचे वरिष्ठ खासदार आहेत. त्यांची राज्यसभेत सध्या तिसरी टर्म सुरु आहे. राऊत हे शिवसेनेच्या मुखपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. तर वेणूगोपल धूत देखील शिवसेनेकडून राज्यसभा खासदारकीची तिसरी टर्म पूर्ण करीत आहेत. मात्र, ते राजकीय व्यक्तीमत्वापेक्षा व्यावसायीक म्हणूनच ओळखले जातात. त्याचबरोबर अनिल देसाई हे देखील शिवसेनेचे राज्यसभेतील तिसरे खासदार असून ते दुसऱ्यांदा खासदारकी सांभाळत आहेत. त्यामुळे शिवसेनेने जर ही ऑफर स्विकारली तर त्यांना संजय राऊतांना उपसभापतीपद द्यावे लागेल. मात्र, हे संविधानिक पद असल्याने या पदावर विराजमान झाल्यास राऊत यांना अराजकीय भुमिकेतच रहावे लागेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2018 10:43 am

Web Title: bjp gives big offer for shiv sena discussion about giving rajya sabha deputy chairman
Next Stories
1 दिव्यांग पतीला पाठीवर उचलून CMO कार्यालयात पोहोचली महिला, कारण…
2 सरकारच स्वतः ‘फेक न्यूज’चे सर्वात मोठे गुन्हेगार : अरुण शौरी
3 बसपाची दुटप्पी भूमिका; मायावती सरकारने देखील अॅट्रॉसिटीविरोधात दिले होते आदेश
Just Now!
X