पंतप्रधान आवास योजनेंतर्गत (पीएमवायए) बांधण्यात आलेल्या घरांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांच्या प्रतिमा लावण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या दोघांच्या प्रतिमा असलेल्या सिरॅमिक्सच्या टाईल्स बनवण्यात येणार असून पाहुण्यांना दिसेल अशा पद्धतीने त्या घराच्या भिंतीवर बसवण्यात येणार आहेत, मध्य प्रदेश सरकारने हा निर्णय घेतला आहे.

राज्याच्या नागरी प्रशासन विभागाने सर्व पालिकांना याबाबत आदेश दिले आहेत. या आदेशानुसार, पीएमएवाय योजनेंतर्गत तयार करण्यात आलेल्या घरात मोदी आणि चौहान यांच्या ४५० बाय ६०० एमएमच्या दोन टाईल्स लावण्यात येणार आहेत. यांपैकी एक टाईल स्वयंपाक घरातील किचन ओट्याच्यावर लावायची आहे तर दुसरी टाइल घराच्या मुख्य दरवाजाच्यावर लावायची आहे. या टाईल्सच्या वर सबका सपना-घर हो अपना अशी वाक्येही लिहीण्यात येणार आहेत. तसेच दुसऱ्या प्रकारे डाव्या बाजूला मोदींची तर उजव्या बाजूला चौहान यांची प्रतिमा लावण्यात येणार आहे. या दोन्ही प्रतिमांच्या मध्ये घोषवाक्य तसेच त्याच्यावर भाजपाचे आदर्श दीन दयाल उपाध्याय यांची प्रतिमा लावाव्यात असे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, काँग्रेसने भाजपा सरकारच्या या प्रकारावर आक्षेत घेत जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. काँग्रसेने म्हटले की, ही गरीबांसाठी सरकारच्यावतीने सुरु करण्यात आलेली योजना आहे. त्यामुळे त्यावर राजकारण व्हायला नको. सत्ताधारी पक्ष अशा प्रकारे राजकारण करुन चुकीचा पायंडा पाडत आहेत. मात्र, भाजपाने या प्रकाराचे समर्थन केले असून यात चुकीचे काही नसल्याचे म्हटले आहे.