भाजप-सरकारमध्ये चर्चा सुरू; पदाधिकारी नेमण्याबाबतही संभ्रम
अमित शहा दुसऱ्यांदा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष झाल्यानंतर आता केंद्र सरकारमध्येही मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झाली आहे. नव्या अध्यक्षांच्या तालमीत नवे पदाधिकारी आधी नेमावेत की आधी मंत्रिमंडळ विस्तार करावा, यावर मात्र पक्ष व सरकारमध्ये एकमत झालेले नाही. केंद्रीय मंत्रिमंडळातून यंदा सहा मंत्र्यांना संघटनेच्या कामासाठी सुट्टी देण्यात येईल, असा दावा सूत्रांनी केला; परंतु मंत्रिमंडळ विस्तारात डच्चू मिळालेल्यांची पक्षात नियुक्ती केल्यास नकारात्मक प्रसिद्धी होण्याची भीती भाजप नेत्यांना आहे. त्यामुळे काही मंत्र्यांनी तर आत्तापासूनच शहा यांची यासाठी भेट मागितली आहे. आम्हाला हटवायचे झाल्यास आधी पक्षाची जबाबदारी द्या, मग मंत्रिमंडळाचा राजीनामा देऊ, अशी विनवणी राज्यमंत्री करू लागले आहेत.
दुसऱ्यांदा अध्यक्ष झाल्याने शहा यांचा दरारा पुन्हा प्रस्थापित झाला आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्रीदेखील शहा यांच्या ‘गुडबुक’मध्ये राहण्यासाठी संधी शोधत आहेत. एका राज्यातील केंद्रीय राज्यमंत्र्याने तर शहा यांचे अभिनंदन न करताच स्वगृही परतणाऱ्या प्रदेश स्तरावरील नेत्यांना रविवारी पुन्हा ११, अशोका रस्त्यावर पिटाळले. शहा यांची अध्यक्षपदाची निवडणूक सुरळीतपणे पार पडल्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झाली आहे. त्यासाठी प्रारंभी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वीचा मुहूर्त निश्चित करण्यात आला होता; परंतु आता मंत्रिमंडळ विस्तार अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर होण्याची चर्चा दिल्लीत रंगली आहे.
मंत्रिमंडळ विस्तार, राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर नामनिर्देशित केले जाणारे सदस्य, एससी-एसटी आयोगाचे सदस्य तसेच कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आदी रिक्त पदांवरदेखील अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतरच नियुक्ती केली जाईल. त्यामुळे शहा यांच्या नव्या टीमच्या घोषणेस विलंब होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तारात उत्तर प्रदेश तसेच दलित चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. शहा यांच्या टीममध्येही सध्या एकही प्रमुख दलित चेहरा नाही.
माजी राष्ट्रीय सरचिटणीस रमाशंकर कठेरिया केंद्रात मंत्री झाल्यापासून उत्तर भारतात संघटनेत दलित नेता नाही. त्यामुळे शहा यांच्या टीममध्ये दलित नेत्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. शहा यांच्या टीममध्ये जास्तीत जास्त वेळ देणारे व विविध राज्यांत प्रवास करणाऱ्या नेत्यांना संधी दिली जाणार आहे. केंद्रात मंत्रिमंडळ विस्तार व शहा यांच्या नव्या टीमची घोषणा दोन दिवसांच्या अंतराने करण्यात येईल, असा दावा एका वरिष्ठ केंद्रीय नेत्याने केला.