आसाममधील पूर्वीच्या काँग्रेस सरकारने राज्यावरील १० हजार कोटी रुपयांच्या कर्जाचे दायित्व नव्या सरकारच्या डोक्यावर ठेवले आहे, असे आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी म्हटले आहे. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकारने आर्थिक साहाय्य द्यावे, अशी मागणी सोनोवाल यांनी केली.
सोनोवाल यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याशी जवळपास अर्धा तास चर्चा केली. राज्याच्या आर्थिक स्थितीबाबतची श्वेतपत्रिका या वेळी सोनोवाल यांनी मोदी यांना सादर केली. माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी राज्यावर १० हजार कोटी रुपयांच्या कर्जाचे दायित्व ठेवले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
या स्थितीतून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकार केवळ केंद्र सरकारवर अवलंबून न राहता अंतर्गत स्रोत तपासून पाहात आहे, मात्र राज्याची सद्य:स्थिती पाहता केंद्राकडून मदत मिळणे गरजेचे आहे, असे ते
म्हणाले.
सोनोवाल यांनी केलेल्या विनंतीनुसार राज्याला सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन या वेळी मोदी यांनी दिले. त्यानंतर सोनोवाल यांनी अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेऊन आर्थिक सहकार्याची मागणी केली.