भारत आणि चीनमधील तणावपूर्ण संबंधांचा मुद्दा चर्चेत असतानाच काँग्रेसचे प्रवक्ते जयवीर शेरगिल यांनी केंद्र सरकावर निशाणा साधला आहे. जयवीर यांनी मंगळवारी (३० जून २०२०) ट्विटवरुन गुजरातमध्ये उभारण्यात आलेला स्टॅच्यू ऑफ युनिटी हा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकावरुन भाजपावर टीका केली आहे. वल्लभभाई पटेल हे भारताच्या अखंडतेचे आणि सार्वभौमत्वाचे प्रतिक आहेत. असं असताना भाजपाने त्यांचेच स्मारक चीनकडून बनवून घेण्याचा पर्याय निवडला. काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी कॅगच्या अहवालाचा संदर्भ देत पटेल यांचे स्मारक उभं करताना मोठ्या आकाराचे ५५३ साचे हे चीनमधून बनवल्याचं म्हटलं आहे. यासाठी भाजपाने माफी मागितली पाहिजे असं जयवीर यांनी म्हटलं आहे. “टीव्हीवर मेक इन इंडिया आणि प्रत्यक्षात चीनकडून सामान खरेदीचे धोरण” असं म्हणत त्यांनी सरकारची भूमिका ही दुहेरी असल्याचं म्हटलं आहे.

जयवीर यांनी पटेलांच्या स्मारकासंदर्भात ट्विट करण्याआधी केलेल्या दुसऱ्या एक ट्विटमध्ये ५९ अॅपवर बंदी आणण्याबरोबरच भाजपा सरकारने आणखीन महत्वाची पावलं उचलणं गरजेचं आहे. “सर्वात आधी ५८ वर्षांमधील सर्वात कमी संरक्षण निधी दिला आहे तो वाढवण्यात यावा. त्याचप्रमाणे माऊंटन स्ट्राइक क्रॉप्सची पुन्हा नियुक्त करण्यात यावी. युपीए सरकारने सीमेवर नजर ठेवण्यासाठी या विशेष दलाची स्थापना करण्यात आली होती. मात्र भाजपा सरकारने पुरेसा निधी उपलब्ध नसल्याचे सांगत ही तुकडी स्थगित केली होती. त्याच प्रमाणे पीएम केअर्स फंडमध्ये चीनकडून मिळालेलं दान परत करण्यात यावं. आपल्यावर कोणाचे उपकार नकोत म्हणून हा निधी परत केला जावा अशी मागणी जयवीर यांनी केली आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही मागील काही वर्षांमध्ये चीनमधून आयात वाढल्याचे सांगत भाजपा सरकारवर टीका केली. ‘मेक इन इंडिया’ची चर्चा होते मात्र ‘बाय फ्रॉम चायना’ (चीनकडून खरेदी करणे) अंमलात आणलं जातं. “आकडे खोटं बोलत नाहीत. भाजपा सांगताना मेक इन इंडिया सांगते आणि करताना बाय फ्रॉम चायना करतात,” असं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सरकार सत्तेत असताना चीनमधून होणारी आयात कमी झाली होती तर आता नरेंद्र मोदींच्या काळात आयात वाढल्याची आकडेवारी दाखवणारा एक ग्राफही राहुल यांनी शेअर केला आहे.