कर्नाटकमधील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने भ्रष्टाचारामध्ये विश्वविक्रम केल्याची धारदार टीका कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी हावेरी येथील जाहीर सभेत केली. कर्नाटकमधील विधानसभेसाठी येत्या ५ मे रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी राहुल गांधी कर्नाटकमध्ये आले आहेत. 
राहुल गांधी म्हणाले, केंद्र सरकारमधील भ्रष्टाचारावर भारतीय जनता पक्ष सतत बोलत असतो. मात्र, आपली सत्ता असलेल्या राज्यातील भ्रष्टाचाराचा त्यांना विसर पडलाय. खरंतर भ्रष्टाचारामध्ये कर्नाटकमधील सरकारने विश्वविकमच केलाय. लोककल्याणासाठी आपण निवडून आलो आहोत, याचा त्यांना विसरच पडलाय. त्यांचे मंत्री केवळ आपापासात भांडण्यात गुंतले आहेत.
तुम्हाला असेच सरकार पुन्हा हवे का, असा प्रश्नही राहुल गांधी यांनी यावेळी विचारला. २००८मधील निवडणुकीच्यावेळी पैशांच्या जोरावर भाजपने राज्यात सत्ता हस्तगत केली होती, असा आरोप करून, कर्नाटकमध्ये सध्या भाजपचे सरकार नसून, बेल्लारी सरकार असल्याची टीकाही त्यांनी केली.