काँग्रेसचे नेते रणदीप सिंह सूरजेवाला यांनी गुरुवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दात टीका केली आहे. “योगी सरकारच्या उद्धटपणाला मर्यादा नाहीय. योगी, तुम्हाला मुलगी आणि मुलगा असता, तर सामूहिक बलात्काराचं आणि मृतदेहावर मध्यरात्री अंत्यसंस्कार करण्याचं दु:ख समजलं असतं” अशा शब्दात सूरजेवाला यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली.

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वद्रा यांच्यासोबत हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी चालले असताना सूरजेवाला यांनी हे विधान केले. या पीडित तरुणीचे मंगळवारी उपचारादरम्यान रुग्णालयात निधन झाले. दिल्ली-यूपी सीमेवर काँग्रेस नेत्यांचा ताफा अडवण्यात आला. काँग्रेस नेत्यांसोबत कार्यकर्ते होते. पोलिसांनी रोखल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी १०० किलोमीटर अंतर पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला.

उत्तर प्रदेश पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांवर केलेल्या लाठीचार्जबद्दल सूरजेवाला म्हणाले की, “अशी धक्काबुक्की करतात का?, हा मार्ग आहे का? राहुल गांधींबरोबर धक्काबुक्की केली, पोलीस लोकांना अमानवीय वागणूक देत आहेत.” “किती लोकांना अटक करणार? कितीवेळा लाठीचार्ज करणार?” असा सवाल सूरजेवाला यांनी विचारला.