गुजरातचे आरोग्य मंत्री शंकर चौधरी यांनी मच्छर हे दहशतवाद्यांप्रमाणे असल्याचे म्हटले आहे. ‘मलेरियामुक्त अहमदाबाद’ कार्यक्रमात बोलताना शंकर चौधरी यांनी मच्छरांची तुलना दहशतवाद्यांसोबत केली. ‘दहशतवादी मच्छरप्रमाणे आहेत आणि त्यांच्याशी दोन हात करणे म्हणजे देशभक्ती आहे,’ असे शंकर चौधरी यांनी म्हटले.

‘जेव्हा एखादी व्यक्ती मच्छरबद्दल बोलते, तेव्हा मला अभिनेते नाना पाटेकर यांचा मच्छरवरील डायलॉग आठवतो. मात्र मी तो डायलॉग वापरणे नेहमीच टाळतो,’ असे आरोग्य मंत्री चौधरी यांनी गमतीत म्हटले. चौधरी यांच्या या वाक्यावर उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या. ”मच्छर दहशतवादी असतात. ते सायलेंट किलर असतात. मात्र आपण त्यांना गांभीर्याने घेत नाही. जेव्हा (दहशतवादी हल्ल्यांमध्ये) लोक मृत्यूमुखी पडतात, त्यावेळी आपण कँडल मार्च काढतो. मात्र आपण मलेरियामुळे होणाऱ्या मृत्यूंकडे लक्ष देत नाही,’ असे शंकर चौधरी ‘मलेरियामुक्त अहमदाबाद’ कार्यक्रमात बोलताना म्हणाले. यावेळी शंकर चौधरी यांनी मागील वर्षभरात मलेरियासंदर्भातील महत्त्वाची आकडेवारीदेखील सांगितली. ‘गेल्या वर्षभरात मलेरियाची ४० हजार घटना समोर आल्या आहेत. मलेरियाविरोधात लढणे ही देशभक्ती आहे,’ असे चौधरी यांनी म्हटले.

‘बहुतांश लोकांना त्यांचे घर मच्छरमुक्त आहे, असे वाटते. मात्र प्रत्यक्षात तसे नसते. यासाठी ड्रोनचा वापर करायला हवा, असे मला वाटते. मच्छरांची पैदास होणाऱ्या जागा नगरपालिकेने शोधून काढायला हव्यात,’ असे चौधरी यांनी म्हटले. अहमदाबाद महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार शहरात २०१४ मध्ये ६ हजार ३५८, २०१५ मध्ये ६ हजार ८५७ तर २०१६ मध्ये ९ हजार ९७९ घटना समोर आल्या आहेत.