भाजपाने 2017-18 आर्थिक वर्षातील एकूण उत्पन्न घोषित केलं आहे. हे उत्पन्न बाहुबली चित्रपटाने केलेल्या कमाईइतकं आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने दिलेल्या रिपोर्टनुसार भाजपाचं एकूण उत्पन्न 1027 कोटी असून यामधील 74 टक्के म्हणजेच 758.47 कोटी रुपये खर्च केले आहेत. काँग्रेसने अद्याप आपला ऑडिट रिपोर्ट सादर केलेला नाही.

बसपाचं एकूण उत्पन्न 51.7 कोटी असून यामधील 29 टक्के (14.78 कोटी) रक्कम पक्षाने खर्च केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे ज्याने एकूण उत्पन्नापेक्षा जास्त पैसे खर्च केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचं एकूण उत्पन्न 8.15 कोटी अशून त्यांनी एकूण 8.84 कोटी रुपये खर्च केले आहेत.

दरम्यान 2016-17 शी तुलना करता 2017-18 मध्ये भाजपाचं उत्पन्न कमी झालं आहे. 2016-17 मध्ये भाजपाचं उत्पन्न 1034 कोटी होतं, जे 2017-18 मध्ये 1027-347 कोटी झालं. सहा राष्ट्रीय पक्षांनी आपल्या उत्पन्नापैकी 1041.80 कोटी रुपये स्वैच्छिक निधीतून जमा केलेले आहेत.

2017-18 दरम्यान सहा राष्ट्रीय पक्षांपैकी फक्त भाजपाने आपल्या उत्पन्नापैकी 210 कोटी रुपये मदतनिधीतून आल्याची माहिती उघड केली होती. सीपीआय (एम) पक्षाने मदतनिधी हा कर वाचवण्याची नवी पद्धत असल्याचा आरोप केला होता. आजकाल राजकीय पक्ष आपलं कमिशन मिळवण्यासाठी मदतनिधीचा वापर केला जात असून, राफेल घोटाळ्यात हेच करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता.