भाजपाने माझा आणि माझी आई मेनका गांधी यांचा कायम सन्मान केला आहे. त्यामुळे भाजपाबद्दल माझी कोणतीच तक्रार नसल्याची भावना उत्तर प्रदेशमधील सुलतानपूरचे भाजपाचे खासदार वरुण गांधी यांनी व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘टेलिग्राफ’मध्ये प्रकाशित झालेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांचे नवे पुस्तक ‘ए रूरल मॅनिफेस्टो: रिअलायझिंग इंडियाज फ्युचर थ्रू हर विलेजेस’ याचीही माहिती दिली. ते म्हणाले, मला नागरिकांचा इतिहास आणि भारतातील आंदोलनांवर पुस्तक लिहायचे होते. मात्र, संपूर्ण देशाचा दौरा करताना लक्षात आले की, ग्रामीण अर्थव्यवस्था हा महत्वाचा विषय आहे. त्यामुळे मी शैक्षणिक पुस्तक लिहिण्याऐवजी असे पुस्तक लिहिण्याची तयारी केली जी लोकांच्या नेहमी कामास येईल.

ग्रामीण भागातील संकटाकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. यासाठी कोणत्याही एका सरकारला जबाबदार ठरवता येणार नाही. अनेक विषय असे असतात की जे राज्य आणि केंद्र सरकारसमोर असतात.

आपले जीवन आणि राजकीय प्रवासाबद्दल बोलताना ते म्हणाले की, मी अशा वयात (वय२९) पक्षाचा सरचिटणीस बनलो, जेव्हा लोक याबाबत विचारही करत नसतात. पण मला वाटते की एक संघटना व्यक्ती विशेष किंवा त्यांच्या आकांक्षांपेक्षा मोठे असते. लोकांची सेवा करणे हा माझा उद्देश होता.

भाजपामध्ये पक्षाचे नेते तुम्हाला भविष्यातील धोका किंवा अडचण म्हणून पाहतात का, असा सवाल त्यांना विचारण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले की, इतक्या वर्षांत माझ्यासमोर अनेक नवीन विषय समोर आले. पण मला कधीच रोखण्यात आले नाही. यासाठी मी पक्षाचा आभारी आहे. माझ्या आईला कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. यापूर्वीही तिने एनडीएच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून काम पाहिले आहे. तिचा आणि माझा सन्मान केला असून माझी पक्षाविरोधात कोणतीच तक्रार नाही.

काँग्रेसमध्ये सहभागी होणार असल्याच्या अफवांबाबत त्यांनी विचारले असता ते म्हणाले की, मी ट्रॅक बदलणाऱ्यांपैकी नाही. कारण ते मला शोभत नाही. माझ्याबाबत कधीही असे होणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp has treated me and my mother maneka gandhi with dignity and i have no complaints says mp varun gandhi
First published on: 20-01-2019 at 14:05 IST