एनडीएतून बाहेर पडण्याची तेलुगू देशम पक्षाची कृती अपेक्षित होती. आता इतर पक्षही एनडीएतून बाहेर पडतील. भाजपाचे एनडीएतील कोणत्याही घटक पक्षाशी चांगले संबंध राहिले नसल्याची प्रतिक्रिया शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिली. टीडीपीने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर सेनेने दिलेली ही पहिली प्रतिक्रिया होती. तर दुसरीकडे, एनडीएच्या पूर्वीच्या नेत्यांनी आघाडी कायम राहावी म्हणून प्रयत्न केले होते. पण भाजपा आता ओव्हरकॉन्फिडन्ट (अतिआत्मविश्वास) आहे. पण २०१९ हे वर्ष त्यांच्यासाठी अत्यंत आव्हानात्मक आणि खडतर असेल, असा इशारा शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनीही दिला.

बुधवारी रात्री टीडीपीने केंद्र सरकारकडून आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळत नाही व पंतप्रधान नरेंद्र मोदी भेटही देत नसल्याचे सांगत आपले दोन केंद्रीय मंत्री राजीनामा देतील असे जाहीर केले होते. त्यावर शिवसेनने आपली प्रतिक्रिया दिली. शिवसेनेला हे अपेक्षितच होते. आता इतर पक्षही एनडीएतून बाहेर पडले आहेत. घटक पक्षांशी भाजपाचे संबंध चांगले नाहीत. हळूहळू उर्वरित घटक पक्षही बाहेर पडतील, अशी भविष्यवाणी संजय राऊत यांनी केली.

सेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनीही पक्षाची भूमिका माध्यमांसमोर मांडली. टीडीपीच्या आधीच उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. टीडीपीच्या दोन मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. भाजपाने आता तरी यावर विचार करावा. एनडीएच्या आधीच्या नेत्यांनी ही आघाडी कायम ठेवली होती. पण त्यांना आता अतिआत्मविश्वास आहे. २०१९ हे वर्ष भाजपासाठी खूप आव्हानात्मक असेल, असा इशारा कायंदे यांनी दिला. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाबरोबर युती न करण्याचा सर्वांत प्रथम निर्णय शिवसेनेनेच जाहीर केला होता.