नथुराम वाद प्रकरणात भाजपचा सवाल

तुतिकोरिन/ मदुराई : ‘स्वतंत्र भारतातील पहिला अतिरेकी हिंदू होता’ या तामिळ अभिनेते कमल हासन यांनी केलेल्या वक्तव्यावरून उद्भवलेला वाद भाजपने बुधवारी आणखी तापवला. हा जाहीर सभेत बोलण्याचा विषय नसून, गांधीजींच्या हत्येला अनेक वर्षे उलटून गेल्यानंतर तो उकरून काढण्यासाठी त्यांना कोणी प्रोत्साहन दिले, असा प्रश्न पक्षाने विचारला. दरम्यान, आपण जे काय बोललो ते ‘ऐतिहासिक सत्य’ होते, अशी भूमिका हासन यांनी घेतली आहे.

ज्यांनी दहशतवादामुळे आपला नेता गमावला, तेच आता या अभिनेत्याला त्याच्या वादग्रस्त वक्तव्यासाठी पाठिंबा देत आहेत, असे सांगून भाजपच्या तामिळनाडू प्रदेशाध्यक्ष तामिलसाई सौंदरराजन यांनी काँग्रेसवर अप्रत्यक्ष टीका केली.

नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधी यांची हत्या केल्याच्या संदर्भात, ‘स्वतंत्र भारताचा पहिला अतिरेकी हिंदू होता’, असे रविवारी अरावकुरिची येथील सभेत बोलून कमल हासन यांनी वादाला तोंड फोडले होते.

दहशतवादाला कुठलाही धर्म नसतो, असे सांगून तामिळनाडू काँग्रेसचे अध्यक्ष के.एस. अळगिरी आणि द्रविडार कळघमचे नेते के. वीरमणी हे हासन यांचे वक्तव्य ‘साजरे’ का करत आहेत, असा प्रश्न सौंदरराजन यांनी विचारला. आपण जे बोलत आहोत ते चुकीचे असल्याचे हासन यांनी आधी समजून घ्यायला हवे. आपण कुठल्याही स्वरूपातील दहशतवाद स्वीकारायला नको, असे त्या पत्रकारांना म्हणाल्या.

प्रचारबंदीची मागणी

गांधीजींच्या हत्येचा मुद्दा उकरून काढून तो हिंदू दहशतवादाशी जोडायला कमल यांना कुणी प्रोत्साहन दिले? हा एखाद्या पोटनिवडणुकीच्या जाहीर सभेत बोलण्याचा विषय नाही. कमल हासन यांची कुणी दिशाभूल करत आहे, त्यांना निर्देश देत आहे, की ते स्वत: अप्रगल्भ वक्तव्ये करत आहेत हे कळत नाही असे सांगून, निवडणूक आयोगाने हासन यांना प्रचार करण्यावर बंदी घालावी, अशी मागणी त्यांनी केली.

कमल हासन वक्तव्यावर ठाम

या मुद्दय़ावर वादात सापडलेले मक्कल निधी मैयमचे नेते हासन यांनी आपण जे काय बोललो ते ‘ऐतिहासिक सत्य’ होते, असे म्हटले आहे. मी आरावाकुरिची येथे जे बोललो त्यामुळे ते लोक रागावले आहेत. मी तेथे जे काही बोललो, ते ऐतिहासिक सत्य आहे. मी कुणालाही वादात ओढण्यासाठी असे केले नाही, असे मदुराई जिल्ह्य़ात प्रचारादरम्यान बोलताना हासन म्हणाले. आपल्या भाषणाचा निवडक भाग संपादित करण्यात आल्याचा आरोप करताना, माझ्याविरुद्धचे आरोप पत्रकारांनाही लागू होतात असे ते म्हणाले. मी हिंदूंच्या भावना भडकावल्याचे म्हटले जात आहे, मात्र माझ्या कुटुंबात अनेक हिंदू आहेत, असेही त्यांनी नमूद केले.