दिल्ली पोलिसांनी एखाद्या हरवलेल्या व्यक्तीचा करतात तशी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची चौकशी करून एकच खळबळ उडवून दिली. राहुल गांधी सध्या सुटीवर असल्याने पोलिसांनी केलेल्या या चौकशीला ‘हेरगिरी’ ठरवून काँग्रेस नेत्यांनी सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल केला. टीव्ही वा इंटरनेटच्या जमान्यात राहुल गांधी यांच्या दिसण्याचे तपशील त्यांच्याच कार्यालयातून गोळा केल्याने दिल्ली पोलिसांच्या कारभाराविषयी अनेक तर्कवितर्क दिवसभर लढवण्यात आले.
अर्थात, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षिततेसाठी ही नियमित चौकशी केल्याची सारवासारव दिल्ली पोलिसांनी केली. एखाद्या नेत्याच्या खासगी जीवनात ढवळाढवळ करणे ही गुजरातची परंपरा असेल, भारताची नाही, असा टोमणा काँग्रेस प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावून या ‘राजकीय हेरगिरी’ प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली.
राहुल गांधी हे काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत. त्यांच्यावर पाळत ठेवण्याचा हा प्रकार असल्याने केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकारावर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी सिंघवी यांनी केली. राहुल यांच्याविरोधातील कथित हेरगिरीच्या तापलेल्या प्रकरणावर खुद्द पोलीस आयुक्त भीमसेन बस्सी यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले, तर भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी सुरक्षाविषयक चौकशीला हेरगिरी ठरवल्याने काँग्रेसचे डोके फिरल्याचे प्रत्युत्तर दिले.
अधिकाऱ्यांचे छायाचित्रदेखील काढले. राहुल गांधी खासदार आहेत; त्यामुळे संसदेत त्यांच्याविषयी सर्व माहिती आहे. तरीही तुम्ही माहिती का विचारता, अशी विचारणा या कर्मचाऱ्यांनी केली. दरम्यान, राहुल यांच्यावर पोलीस पाळत ठेवून ‘राजकीय हेरगिरी’ करीत असल्याचा गंभीर आरोप अभिषेक मनू सिंघवी यांनी केला. तर राहुल गांधी संसदेत अनुपस्थित आहेत. त्यामुळे चिंतित झालेल्या काँग्रेस नेत्यांचे डोके फिरले असल्याचे खोचक प्रत्युत्तर भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी दिले. तर कुणाही अतिमहत्त्वाच्या व्यक्तीची माहिती जमवण्यासाठी अर्जाचा नमुना ठरलेला असतो. त्यानुसार प्रश्न विचारण्यात येतात. यात कुठेही हेरगिरी करण्याचा उद्देश नसतो असे  पोलिसांनी सांगितले.

नेमके काय झाले?
 ‘चिंतन’ दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांच्या अनुपस्थितीत पोलीस अधिकाऱ्यांच्या चमूने त्यांच्या कार्यालयास भेट दिली. शमशेर सिंह हे या चमूचे प्रमुख होते. शमशेर सिंह यांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना राहुल यांचा रंग कसा आहे, त्यांच्या केसांचा रंग कसा आहे, त्यांची उंची, वजन किती आहे. असे प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. कर्मचाऱ्यांनी त्यास आक्षेप घेतला.