तिरुवल्ला : केरळातील डावी लोकशाही आघाडी व संयुक्त लोकशाही आघाडी यांच्यात घोटाळे करण्याची स्पर्धा लागली आहे. त्यांना लोकांच्या कल्याणाची काहीही काळजी नसून ते स्वत:चे खिसे भरण्यात गुंतले आहेत, असा आरोप केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी एका रोड शोच्या वेळी केला आहे. केरळमध्ये विधानसभा निवडणुका होत असून तेथील राजकारणात पाय रोवण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत.
त्या म्हणाल्या, की डाव्या आघाडीने शबरीमला प्रकरणात राजकारण करताना ज्या महिला अय्यपाच्या भक्तगण नव्हत्या त्यांना डोंगरावरील मंदिरात पाठवले व त्यांनी तेथे जाऊन लाल सलाम ठोकला. पथनमथिट्टा जिल्ह्य़ातील थिरूवला येथील रोड शोच्या वेळी त्यांनी सांगितले, की पोलिसांनी या वेळी भक्तगणांवर निष्ठुरपणे कारवाई केली. अयप्पा मंदिर पथनमथिट्टा जिल्ह्य़ातच असल्याने त्यांनी या प्रश्नाबाबत सरकारवर टीका केली.
पाळीच्या वयोगटातील महिलांसह सर्वच महिलांना अय्यपा मंदिरात प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या २०१८ मधील निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न केरळ सरकारने केले. त्या वेळी म्हणजे दोन वर्षांपूर्वी तेथे हिंसक निदर्शने झाली होती. प्रथेप्रमाणेअय्यपा मंदिरात १० ते ५० या मासिक पाळीच्या वयोगटातील महिलांना दर्शनासाठी प्रवेश नाही. सीतारामन म्हणाल्या,की पथनमथट्टा हे ठिकाण स्वामी अय्यपांसाठी प्रसिद्ध आहे. या प्रश्नावर पोलिस कारवाई करण्यात आली. हिंसाचार झाला. निदर्शक महिलांवर कारवाई झाली. स्वामी दर्शनासाठी जाणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. या सगळ्यात ज्या महिलांचा अय्यपांवर विश्वास किंवा श्रद्धा नाही अशा महिलांना मंदिरात प्रवेश देण्याचा कट होता. ज्या महिला तेथे गेल्या त्या अय्यपा भक्त नव्हत्याच, त्यांनी तेथे लाल सलाम ठोकला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 5, 2021 12:07 am