News Flash

भाजपचे ‘सुरत – ए – हाल’!

असे म्हणतात, की ‘सूर्य अस्त तो सुरती मस्त’.

वस्तू व सेवा करातील तरतुदींवरून सुरतमधील व्यापारी संतप्त असल्याचे चित्र आहे.

असे म्हणतात, की ‘सूर्य अस्त तो सुरती मस्त’. थोडक्यात काय, तर सुरतकरांचे खरे चैतन्य जागे होते ते सूर्य मावळल्यानंतरच. याबाबत हे झगमगते शहर म्हणजे मुंबईचे चुलतभावंडच. एका जागतिक पातळीवरील अभ्यासानुसार, एकेकाळी जगात सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या नागरी क्षेत्रांत या शहराचा चौथा क्रमांक होता.

हे शहर चमचमते ते तेथील हिऱ्यांमुळे. येथे जगातील ९० टक्के हिऱ्यांना पैलू पाडले जातात. येथे त्यांना लकाकी मिळते. दिवस उतरू लागतो तशी ही लकाकी येथील रात्रीच्या माहोलात बुडत जाते.. अन् मग हळूहळू ती रात्र ‘चढत’ जाते. माहितीसाठी म्हणून २०१० पासूनची ही आकडेवारी सांगायला हवी. गुजरातमधील सर्वात जास्त ‘परमिट होल्डर’ – परवानाधारक – महिला सुरतेत आहेत.

या शहराबाबत आणखी एक लोकप्रिय वाक्य आहे. ‘सुरत नू जमण अने काशी नू मरण’. म्हणजे खायचे तर सुरतमध्ये खा आणि मरायचेच असेल तर तिकडे काशीला जा.. यातून प्रकट होते ती सुरतकरांची जिव्हालौल्य, रसनाप्रेम, खाबूगिरी. हिवाळ्यातल्या खास उंधियूपासून घारीपर्यंतचा हा खाद्यप्रवास आहे. घारी म्हणजे तुपात बुडविलेले, सुक्या मेव्यात घोळवलेले माव्याचे लज्जतदार गोळे. १८५७च्या स्वातंत्र्यलढय़ातील सेनानी तात्या टोपे यांचा हा आवडता पदार्थ. अंगात ताकद यावी यासाठी ते घारी खात असत असे म्हणतात.

पण या खाद्यप्रेमी सुरतींना गेल्या १ जुलैपासून हॉटेलांत एक कायमचा जोडीदार लाभला आहे. ते त्याला म्हणतात – विकास! हॉटेलांवर १८ टक्के जीएसटी लागला. हॉटेलांतील खाणे महागले आणि मग चुटकुले, विनोद आणि ‘मेमे’ म्हणजे विनोदी कॅप्शनबाज छायाचित्रांच्या कोपरखळ्या यांना उधाण आले. नरेंद्र मोदींच्या निवडणूक घोषणेची आणि मोठा गाजावाजा केलेल्या गुजरात प्रारूपाची मनसोक्त खिल्ली उडवली त्यांनी. ‘विकास पन आपडी साथे जमायो छे’ – विकासपण आपल्याबरोबर खातोय. असे अनेक विनोद समाजमाध्यमांतून व्हायरल झाले. त्यांचा सामना कसा करायचा हेच भाजप नेत्यांना कळेनासे झाले.

पण येथील वस्त्रोद्योगातील, हिरे उद्योगातील लोकांसाठी मात्र हे गुदगुल्या करणारे विनोद अजिबात विनोदी      नाहीत. वस्त्रोद्योगाची एक गुंतागुंतीची मूल्यव्यवस्था आहे. नोटबंदीने आणि नंतर आलेल्या जीएसटीने ती अक्षरश: उद्ध्वस्त करून टाकली. लाखो कामगारांना बेरोजगार केले. अनेक छोटे कारखाने बंद पडले. प्रभावशाली व्यावसायिकांना भाजपविरोधात जोरदार आंदोलन उभे करावे लागले ते त्यामुळेच. यंदाच्या दिवाळीत पहिल्यांदाच येथील रिंग रोडवर पसरलेला कापडबाजार रोषणाईने उजळला नाही तो त्यामुळेच. लोकांनी निषेध म्हणून दिवाळी साजरी केली नव्हती तेथे. सुरतेतील पांडेसरातील काजळीने काळ्या पडलेल्या गल्ल्यांमध्ये एकेकाळी २४ तास यंत्रमागांची खटखट ऐकू येत असे. आता जाऊन पाहाल तर त्या गल्ल्या शांत पडलेल्या दिसतील. तीन लाखांहून अधिक महिला आपल्या घरी बसून साडय़ांवर, कपडय़ांवर भरतकाम करीत असत. आता एक तर त्यांचे काम गेले आहे किंवा पगार कमी करण्यात आला आहे.

२०१२च्या विधानसभा निवडणुकीत येथील बाराच्या बारा मतदारसंघ भाजपच्या  पदरात टाकून काँग्रेसला भुईसपाट करणाऱ्या सुरतच्या विलापाची, हालअपेष्टांची जाणीव अखेर भाजपला होऊ लागली आहे. अखेर ज्यांचे मासिक घरखर्च वाऱ्यावर उधळला गेला आहे, ते फक्त कामगार नाहीत, तर मतदारही आहेत हे आता भाजप नेत्यांना कळून चुकले आहे.

पण जीएसटी आणि नोटाबंदी हीच तेवढी भाजपची डोकेदुखी नाही. भाजपला सर्वाधिक भय आहे ते पाटीदार समाजाचे. हा तेथील शक्तिशाली समाज. भाजपविरोधात त्याने जवळजवळ रणशिंगच फुंकले आहे. वराच्छा हे पाटीदारबहुल उपनगर. आज तेथे प्रचारासाठी जायचे तर भाजपच्या नेत्यांना दोनदा विचार करावा लागत आहे. ते तेथे गेले, की अचानक कुठून तरी विरोधी घोषणा देणारे पाटीदार तरुण उगवतात. भाजप कार्यकर्त्यांवर अंडय़ांचा मारा होतो, त्यांची पत्रके फाडली जातात. पाटीदार आरक्षण आंदोलनाच्या वेळी हार्दिक पटेलला झालेल्या अटकेनंतर येथीलच वराच्छा, कटग्राम, सार्थना या भागात २०१५ मध्ये पाटीदार आरक्षण आंदोलनाच्या वेळी हार्दिक पटेलच्या अटकेनंतर मोठय़ा प्रमाणावर हिंसाचार आणि जाळपोळ झाली होती.

या सगळ्यात आपल्याला संधी असल्याचा वास काँग्रेसला बरोबर लागला आहे. ८ नोव्हेंबरनंतर लगेच चारच दिवसांत राहुल गांधी पुन्हा सुरत दौऱ्यावर देतात याचा अर्थ एरवी काय असू शकतो? चित्रपट अभिनेते संजीवकुमार यांच्या नावाने उभ्या असलेल्या येथील क्रीडागारात नुकताच काँग्रेसचा मेळावा झाला. खचाखच भरले होते ते. तेथे मोदी आणि रूपानी यांच्या सरकारविरोधात जेव्हा स्थानिक व्यापारी, व्यावसायिक आणि हिरे उद्योजक जहरी टीका करीत होते, अडचणीच्या काळात आपल्या वेदनांकडे दुर्लक्ष केले म्हणून त्यांच्यावर तोंडसुख घेत होते, तेव्हा राहुल गांधी आणि अन्य काँग्रेस नेत्यांच्या चेहऱ्यांवरील आनंद लपून राहत नव्हता. या कार्यक्रमात राहुल गांधी यांच्यापुढे आपली कैफियत मांडताना शशिकांत मश्रूवाला हे बुनाई व्यावसायिक म्हणत होते, ‘मी माझे एक युनिट केव्हाच बंद करून टाकले आहे. कामगारांना कामावरून काढून टाकले आहे. इतर कामगार आता पगार मागत आहेत. पण माझ्याकडे कामच नाही. काय करू मी? ६२ वर्षांचा आहे मी. वाटते, आत्महत्याच करावी आता.’

अशीच गोष्ट तेथील एका साडीउत्पादकाची. कृत्रिम साडीनिर्मिती उद्योगात चांगले नाव असलेले ते उद्योजक. त्यांच्या भावांच्या मालकीच्या तीन कंपन्या त्यांनी बंद केल्या आहेत. ते आता त्यांच्या उद्योगात पगारी नोकर म्हणून काम करीत आहेत. ते सांगत होते, ‘जीएसटीचे विवरणपत्र भरणे म्हणजे दु:स्वप्नच आहे. कशा चालवायच्या आम्ही कंपन्या?’

राहुल यांच्यासमोर लोक आपल्या तक्रारी मांडत होते. व्यथा सांगत होते. लोक चिडलेले होते. खासकरून रत्नकलाकार. त्यांच्या व्यवसायात मंदी आली. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. गेल्या काही वर्षांत त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांच्या संघटनेचे प्रमुख जयसुखभाई सांगत होते, की पंतप्रधानांना आम्ही दहा हजार टपाल कार्डे पाठवली. पण काहीच उपयोग झाला नाही.

बहुधा याच कार्यक्रमात पहिल्यांदा राहुल गांधी यांनी ती कबुली दिली, की नरेंद्र मोदी ज्याप्रमाणे शब्दांचे फुलोरे असणारी भाषणे देतात, तशी भाषणे ते किंवा काँग्रेसचे इतर नेते देऊ शकत नाहीत. ते म्हणाले, ‘ते शिकायला अनेक वर्षे लागतील. पण मी तुम्हाला एक वचन देतो की, आम्ही असे सरकार देऊ की जे तुमचे म्हणणे ऐकेल. तुमची कामे होतीलच अशी हमी मी देणार नाही. पण आम्ही किमान तुमचे म्हणणे तरी ऐकू.’ त्यांच्या या वक्तव्याला समोरच्या गर्दीने टाळ्यांच्या कडकडाटाने दाद दिली.

सुरत हा गरिबीतून श्रीमंत झालेल्या अनेक लोकांच्या कहाण्यांचा महाग्रंथच आहे. मग तो साधा हिऱ्यांना लकाकी देण्याचे काम करीत मोठा झालेला एखादा बडा हिरे व्यापारी असो, की भारतातील गरीब वा मध्यमवर्गीय महिलांना भावणाऱ्या स्वस्तातल्या साडय़ांची निर्मिती करणारा एखादा कापड उद्योजक असो, अशा अनेक कहाण्या येथे घडलेल्या आहेत. अर्थात असे असले, तरी हे शहर अजून एकाच तत्त्वावर चालते – खाई पीने जलसा करो. खा, प्या, मजा करा. येथील निवडणुकासुद्धा आतापर्यंत कोणी फार गांभीर्याने घेत नसे. कारण अखेर भाजपचा विजय ठरलेलाच असे. पण हिरे आणि कापड या उद्योगातील अनेक समस्या आणि त्याला मिळालेली, अंगात नवत्राण संचारलेल्या काँग्रेसची जोड यांमुळे येथील निवडणुकीचे वातावरण आता नक्कीच रसरसले आहे.

कोणत्याही सुरतकराला विचारा, ‘बीजेपी नू शू लागे छे?’ – या वेळी काय होईल वाटतेय भाजपचे? – त्यातले बहुतेक जण हेच सांगतील, की ‘लोचो छे.’ – गडबड आहे. जाता जाता एक सांगायला हवे, लोचो हा खाद्यपदार्थ आहे आणि बहुसंख्य सुरतकरांच्या सकाळच्या नाश्त्यातला तो अविभाज्य घटक आहे. तो बनवतात डाळीपासून. लोणी, चटणी आणि मसालेदार असा तो पदार्थ. दिसतो अस्ताव्यस्त, बेढब असा. म्हणून तर त्याला नाव पडले – लोचो.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2017 2:15 am

Web Title: bjp in gujarat legislative assembly election 2017
Next Stories
1 अफवेनंतर बांगलादेशात तीस हिंदूंची घरे जाळली
2 परग्रहवासीयांशी संपर्क साधण्याचे चीनचे मनसुबे
3 तीन मजली इमारत काही क्षणात कोसळली: व्हिडिओ
Just Now!
X