News Flash

हवा नाराजीची, पण ‘कमळा’चीच

राजकोट मतदारसंघात पंतप्रधानांच्या आजच्या सभेमुळे मुख्यमंत्री निर्धास्त

मुख्यमंत्री विजय रूपानी यांच्या पत्नी अंजली यांनी राजकोटमधील प्रचारसूत्रे हाती घेतली आहेत.

राजकोट मतदारसंघात पंतप्रधानांच्या आजच्या सभेमुळे मुख्यमंत्री निर्धास्त

गुजरात विधानसभा निवडणुकीत प्रचारधुरळा उडत असला तरी स्वतच्या मतदारसंघात आतापर्यंत न फिरकलेले गुजरातमधील एकमेव उमेदवार म्हणजे मुख्यमंत्री विजय रुपानी. या मतदारसंघातून याआधी नरेंद्र मोदी आणि त्याआधी केशूभाई पटेल निवडून गेले आहेत. केवळ विरोधात लढण्यासाठी स्वत:चा मतदारसंघ सोडून राजकोट (प.) मधून हट्टाने उमेदवारी मागणारे काँग्रेस उमेदवार इंद्रनील राजगुरूंचा जोरदार प्रचार आणि हार्दकि पटेलच्या बुधवारच्या सभेसाठी जमा झालेल्या प्रचंड जनसमुदायानंतरही रुपानी यांनी मतदारसंघात परतण्याची घाई केलेली नाही. राज्यात व्यग्र असलेल्या रुपानींसाठी रविवारी मोदीच सभा घेणार आहेत. त्यामुळे या मतदारसंघात मोदींविरुद्ध हार्दकि आणि इंद्रनील राजगुरू अशी लढत होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

राजकोट ओळखले जाते ते वाहनांच्या सुटय़ा भागांच्या उद्योगासाठी. या कामातून तसेच इतर व्यवसायांतून बक्कळ पसा कमावून सुखासीन आयुष्य जगणारे व्यावसायिक राजकोटच्या किसनपारा परिसरात राहतात. दोन- तीन मजल्यांच्या बंगल्यांच्या सरळ रेषेत मध्येच काही इमारती उभ्या राहिलेल्या दिसतात. काही बंगल्यांवर मंदिराचे लहान घुमटही बांधलेले आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्या मतदारसंघात हा परिसर येतो. राज्यभर निवडणूक दौऱ्यांमध्ये व्यग्र असलेल्या रुपानींच्या वतीने त्यांच्या पत्नी अंजली रुपानी प्रचार करत आहेत. किसनपारा मतदारसंघात त्या घरोघरी जाऊन प्रचार करणार असल्याने या भागातील भाजप कार्यकत्रे दुपारी सव्वाचार वाजल्यापासूनच किसनपारा जवळच्या चौकात उभे होते. त्याची तयारी लिमडा चौकाजवळ असलेल्या भाजपच्या प्रचार कार्यालयात साडेतीन वाजल्यापासून सुरू झाली होती. चार वाजताही मोजकीच आठ-दहा डोकी जमल्यावर तेथील प्रचारप्रमुखाने फोन लावायला सुरुवात केली. प्रचारपत्रके, भाजपचे निवडणूक चिन्ह लावलेल्या छत्र्या, गळ्यात घालायच्या पट्टय़ा, फेटे असा सर्व जामानिमा घेऊन किसनपारा चौकात माणसे जमली. कोणी व्यावसायिक तर कोणी वकील. त्यात अवघ्या दोन महिला होत्या. त्यातील एक स्त्रीरोगतज्ज्ञ. मिरवणुकीसाठी आणलेले बँजो पथक शांतपणे उभे होते. मात्र, लहान टेम्पोमधील ध्वनिक्षेपकावरून अचानक ‘घालीन लोटांगण..’ सुरू झाले. मराठी आणि संस्कृत भाषेची सरमिसळ असलेले हे भजन गणेशोत्सवात आरत्यांनंतर म्हटले जाते. हरे राम हरे कृष्ण.. झाल्यावर मोदींच्या आवाजात विकासाचे भाषण सुरू झाले. पदयात्रेसाठी आलेल्यांची संख्या मात्र १८-२० च्या वर जात नव्हती. आणखी दहा मिनिटांनी एक रिक्षा आली. त्यात बसलेल्या चार महिला उतरल्या. त्यानंतर हळूहळू रिक्षांमधून कडेवर पोरं असलेल्या बायका, पुरुष उतरू लागले आणि सवय असल्याप्रमाणे गळ्यात पट्टा आणि हातात पत्रके घेऊन गपगुमान उभे राहिले. पावणेपाच वाजता अंजली रुपानी आल्या आणि प्रचारयात्रेला दणक्यात सुरुवात झाली. हार, फुले, हळदीकुंकू, मिठाई असा ऐवज स्वीकारत त्यांची पदयात्रा सुरू होती. नरेंद्र मोदी जिंकावेत म्हणून मी दिवसातून दोन वेळा देवाला नमस्कार करतो, असे येथील उद्योजक शांतीभाई कणेरिया यांनी सांगितले. ते हरले तरी त्यांचाच विजय आहे. तेच देशाचा विकास घडवू शकतात, असे त्यांचे म्हणणे होते.

दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार इंद्रनील राजगुरू गेले दीड वर्ष मतदारसंघात जमवाजमव करत आहेत. त्यांच्याच नील सिटी रिसॉर्टमध्ये काँग्रसचे गुजरातबाहेरचे नेते मुक्कामाला आहेत. दारातील लॅम्बोíगनी गाडी सोडून ते पदयात्रांमध्ये सहभागी होतात. १४१ कोटी रुपयांची अधिकृत संपत्ती असलेले इंद्रनील राजगुरू निळी जीन्स आणि पांढरे शर्ट घालून नील सिटी रिसॉर्टमध्ये पोहोचले तेव्हा अनेकांची त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी झुंबड उडाली होती. त्यांच्याकडे मागणी घेऊन गेलेला एकही माणूस रिकाम्या हाती परतला नाही, असे रिक्षाचालक सांगतात.

पारडे दोन्ही बाजूला झुकत असले तरी राजकोटचा किल्ला सर करणे काँग्रेससाठी सोपे काम नाही. एका प्रचारफेरीचे पावणेदोनशे किंवा पूर्ण दिवसाचे साडेतीनशे रुपये घेऊन प्रचारासाठी आलेल्यांनाही त्यांच्या भागात भाजपच येणार असल्याचे वाटते. दुकानदार, उपाहारगृहातले वेटर यांनी हार्दकि पटेलची सभा पाहिली. मात्र, राजकोट पश्चिममध्ये कमळच उमलणार असल्याबाबत ते ठाम आहेत. अगदी हार्दकि पटेलची जबरदस्त सभा आयोजित केल्यावर राजकोटमधील ज्या चार जागांवर काँग्रेस व पाटीदार समिती दावा करतेय त्यात राजकोट पश्चिम नाही. आणि त्याला कारण म्हणजे मोदींची रविवारी होणारी सभा. आपल्याकडे पाहून मतदान करण्याचे भावनिक आवाहन मोदींनी प्रभावीपणे केले तर आतापर्यंत केलेली मेहनत वाया जाईल, अशी भीती काँग्रेसच्या गोटात आहे. तर १५ वष्रे मोदींना ओळखत असलेली गुजराती जनता आता या भावनिक आवाहनाला भुलणार नाही, अशी एक धूसर आशाही पाटीदार गटात आहे.

राजकोट पश्चिमेसोबतच भाजपचे आमदार गोविंद पटेलांचा मतदारसंघही काँग्रेसच्या ताब्यात जाणार नसल्याचे दिसते. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात लढण्यासाठी इंद्रनील राजगुरू यांनी जो राजकोट पूर्वचा मतदारसंघ सोडला तिथेही जोरदार टक्कर होऊ शकते. गोंडलमधील जाडेजा कुटुंबीयांकडे असलेल्या परंपरागत मतदारसंघातही भाजपच्या गिताबा जाडेजा यांचे पारडे जड आहे. राजकोट ग्रामीण, जासदेन, जेटपूर आणि धोराजी येथे पाटीदारांचा प्रभाव दिसेल, असे राजकोटमधील पाटीदार अनामत आंदोलन समितीचे समन्वयक हेमांग पटेल यांना वाटते. या वेळी पाटीदार, कोळी, ओबीसी, दलित, व्यापारी, महिला, आरटीआय कार्यकत्रे, शेतकरी, विद्यार्थी असे सारे गट भाजपच्या विरोधात आहेत. त्याचा प्रभाव मतदानावर निश्चित दिसेल, असे गुजरातच्या निवडणुक कामांसाठी आलेल्या ऑल इंडिया महिला काँग्रेसच्या सरचिटणीस शोभना सिंह म्हणाल्या.

फलकयुद्ध

राजकोटमध्ये विजय-पराभवापेक्षाही सध्या फलकबाजीची सर्वात जास्त चर्चा आहे. प्रभावी उपमा आणि वाद-प्रतिवादात माहीर असलेल्या भाजपच्या फलकाशेजारी काँग्रेसने लावलेल्या फलकांवरील टिप्पणीमुळे पहिल्यांदाच सत्ताधारी प्रचारात एक पाऊल मागे पडल्याचे दिसत आहेत. गेल्या पाच वर्षांत केलेल्या ‘सॉलिड’ विकासकामांचे फलक भाजपने राजकोटमध्ये सर्वत्र लावले आहेत. राज्यात भाजपने केलेली कामे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या छबीसोबत लावण्यात आली आहेत. ‘नर्मदेचे पाणी आजी धरणात आणले’ या भाजपच्या फलकाशेजारी ‘२२ वर्षांत राजकोटमधून तीन मुख्यमंत्री झाले, मात्र इथे २० मिनिटेही पाणी येत नाही’ असा ‘सॉलिड’ कामाचा फलक लावला आहे. तीच गत विमानतळाची. ‘राजकोटमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार’ असा भाजपचा फलक आहे. ‘तीन मुख्यमंत्री होऊनही आंतरराष्ट्रीय विमानतळाची पायाभरणी करण्याखेरीज काही झालेले नाही,’ अशी टोलेबाजी काँग्रेसने केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2017 12:36 am

Web Title: bjp in gujarat legislative assembly election 2017 2
Next Stories
1 जीएसटी ‘गब्बर सिंग टॅक्स’ होता तर, संसदेत त्याला पाठींबा का दिला : राजनाथ सिंह
2 गुजरातमध्ये आम्ही महिलांचा आदर करतो म्हणूनच ‘पद्मावती’वर बंदी घातली : विजय रुपानी
3 सुप्रीम कोर्टाच्या ग्रंथालयात पहिल्यांदाच लागणार ‘या’ महिला वकिलाची प्रतिमा
Just Now!
X