भाजप व विरोधकांच्या एकत्रित ताकदीची कसोटी पाहणाऱ्या कैराना लोकसभा मतदारसंघात आज सोमवारी पोटनिवडणूक होत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते हुकूमसिंह यांच्या निधनाने येथे पोटनिवडणूक होत आहे. भाजपने हुकूमसिंह यांची मुलगी मृगांका सिंह यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात राष्ट्रीय लोकदलाकडून तबस्सूम हसन या रिंगणात आहेत. त्यांना समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष व काँग्रेसचा पाठिंबा दिला आहे. या मतदारसंघातील निकाल लोकसभेच्या २०१९ च्या दृष्टीने महत्त्वाचा ठरेल असे मानले जात आहे.

एकूण १७ लाख मतदार असलेल्या या मतदारसंघात मुस्लीम, जाट व दलितांचे प्रमाण मोठय़ा संख्येने आहे. गोरखपूर व फुलपूरमध्ये विरोधकांच्या संयुक्त उमेदवारांनी भाजपचा पराभव केला होता. भाजपने ही जागा राखण्यासाठी जोरदार प्रयत्न चालविले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी या भागात जोरदार प्रचार केला, तर एखाद्या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्र्यांना प्रचार करायला लागणे यातूनच भाजपची अस्वस्थता दिसते, असा टोला समाजवादी पक्ष व काँग्रेसने लगावला आहे. या निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था तसेच ऊस उत्पादकांच्या समस्या हे दोन प्रश्न महत्त्वाचे आहेत. कैरानाबरोबरच उत्तर प्रदेशातील नुरपूर विधानसभा मतदारसंघात आजच मतदान आहे.

विविध राज्यांमध्ये पोटनिवडणूक

कैरानाबरोबरच नागालँडमधील लोकसभेच्या एकमेव जागेसाठीही उद्या मतदान होत आहे. मुख्यमंत्री नैपीयू रिओ यांनी राजीनामा दिल्याने ही पोटनिवडणूक होत आहे. येथे नॅशनल पॉपल्स फ्रंटविरोधात भाजपच्या पीपल्स डेमॉक्रेटिक अलायन्स यांच्यात लढत आहे. याखेरीज विधानसभेच्या पश्चिम बंगालमधील एक, झारखंडमधील दोन, बिहारमधील जोकीहट व मेघालयातील अंपेली येथे पोटनिवडणूक होत आहे. पंजाबमधील शाकोट मतदारसंघात सत्ताधारी काँग्रेस, अकाली दल व भाजप असा तिरंगी सामना आहे. अकाली दल आमदाराच्या निधनाने येथे पोटनिवडणूक होत आहे. केरळमधील चेनगूनर मतदारसंघात सत्ताधारी डावी आघाडीविरोधात काँग्रेसची संयुक्त पुरोगामी आघाडी व भाजप असा तिरंगी सामना आहे. माकप आमदाराच्या निधनाने ही जागा रिक्त आहे.