सलग दुसऱ्यांदा काँग्रेसचा धुव्वा; प्रबळ नेतृत्वाअभावी राज्यात अपयश

आसाममध्ये भाजपने सत्ता राखण्यात यश मिळवले आहे. आसाम गण परिषद व युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल या आपल्या मित्रपक्षांसह भाजपने राज्यात दणदणीत विजय मिळवला आहे. काँग्रेसने अनेक पक्षांना बरोबर घेऊन उभ्या केलेल्या महाआघाडीचा पराभव झाला आहे. आता राज्यात मुख्यमंत्री पुन्हा सर्वानंद सोनोवाल होणार की हेमंतबिस्व सरमा याबाबत उत्सुकता आहे. याबाबत भाजपश्रेष्ठी ठरवतील असे भाजपचे आसाम प्रभारी जय पांडा यांनी नमूद केले आहे.

आसामधील विधानसभेच्या १२६ जागांसाठीची मतमोजणीत रविवारी झाली. करोनाकाळात निवडणूक आयोगाने मार्गदर्शक तत्त्वे आखून दिल्याने संथगतीने मतमोजणी होत होती. सुरुवातीपासूनच भाजपने आघाडी घेतली होती. काँग्रेसने ब्रदुद्दीन अजमल यांच्या ऑल इंडिया युनायटेड डेमॉक्रेटिक फ्रंटला बरोबर घेत महाआघाडीची मोट बांधली. मात्र भाजपने संघटनात्मक बांधणी, विकासकामे तसेच मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या प्रतिमेच्या जोरावर विजय मिळवला. काँग्रेसकडे तरुण गोगोई यांच्या निधनानंतर नेतृत्व नव्हते. त्यामुळे सत्ता परिवर्तन घडवून आणणे शक्य झाले नाही.

मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी माजौली मतदारसंघातून मोठे मताधिक्य मिळवले. भाजपप्रणीत आघाडीने ७० च्या पुढे जागा जिंकत बहुमताचा आकडा सहज ओलांडला. भाजपला स्वबळावर ५६ जागी आघाडी होती. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला २९ जागी आघाडी मिळाली. अजमल यांच्या पक्षाने आपले गेल्यावेळचे संख्याबळ राखताना १४ जागांवर आघाडी मिळवली. भाजपचा मित्रपक्ष असलेल्या आसाम गण परिषदेने दोन आकडी संख्या ओलांडली.  आसाम भाजपने निकालानंतर जल्लोष करणार नसल्याचे जाहीर केले आहे. कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते रुपम गोस्वामी यांनी स्पष्ट केले.

आसाममध्ये भाजपच्या नेता निवडीची उत्सुकता

गुवाहाटी: आसाममध्ये भाजपमध्ये मित्रपक्षांसह बहुमत मिळवले तरी आता मुख्यमंत्रीपद पुन्हा सर्वानंद सोनोवाल यांना मिळणार की ज्येष्ठ नेते हेमंतबिस्व सरमा यांना मिळणार याची उत्सुकता आहे. निवडणूक प्रचारात भाजपने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केला नव्हता. सोनोवाल यांची प्रतिमा चांगली. त्याचा फायदा भाजपला निवडणुकीत झाला. विशेषत: राज्यात गेल्या पाच वर्षांत पायाभूत सुविधांची मोठ्या प्रमाणात कामे झाली. त्यामागे सोनोवाल यांचे नेतृत्व होते. त्यामुळे सोनोवाल यांना मुख्यमंत्रीपदी पुन्हा संधी मिळते की सरमा बाजी मारतात हे पाहणे महत्त्वाचे आहे. हेमंतबिस्व सरमा निवडणूक रणनीती तंत्रात वाकबगार मानले जातात. काँग्रेसमधून आलेले सरमा हे ईशान्यकडील राज्यांमध्ये भाजपच्या संघटनात्मक वाढीत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा तिढा भाजपला कौशल्याने सोडवावा लागणार आहे.

जनतेने आम्हाला आशीर्वाद दिला आहे. आसाम गण परिषद व यूपीपीएल या आमच्या मित्र पक्षांसह आम्ही पुन्हा सत्तेत आलो आहोत.

-सर्वानंद सोनोवाल,  मुख्यमंत्री आसाम