भाजपाची सत्ता देशात आहे, त्यांनी राम मंदिराचे काम सुरु केले नाही तर जनतेचा सत्ताधाऱ्यांवरून विश्वास उडेल असे योगगुरु बाबा रामदेव यांनी म्हटले आहे. तसेच कारसेवक मंदिराचे बांधकाम सुरु करू शकत नाहीत कारण हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. त्यामुळे राम मंदिराची निर्मिती करण्यासाठी अध्यादेश आणणे हा एकमेव पर्याय सरकारपुढे आहे असेही बाबा रामदेव यांनी म्हटले आहे.

योगगुरु बाबा रामदेव यांनी हरिद्वार या ठिकाणी शदाणी दरबाराच्या पाच मजली भवनाचे उद्घाटन केले. त्यानंतर पत्रकारांनी त्यांना राम मंदिराबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी राम मंदिराची निर्मिती करायची असेल तर अध्यादेश हा एकमेव पर्याय असल्याचे म्हटले आहे. राम मंदिर उभारणे हा प्रश्न हिंदू अस्मितेशी जोडला गेला आहे. यासाठी केंद्राने लवकरात लवकर अध्यादेश आणायला हवा नाहीतर जनतेचा भाजपावरचा विश्वास उडेल.

तीन दिवसांपूर्वीही बाबा रामदेव यांनी याच प्रकारचे वक्तव्य केले होते. राम मंदिराबाबत केंद्राने अध्यादेश आणला नाही तर लोकांचा संयम संपेल. अनेक रामभक्त स्वतःहूनच मंदिर बांधण्यास सुरुवात करतील. जर तसे झाले तर धार्मिक तेढ वाढू शकते. लोकांचा संयम सुटण्याची वाट सरकारने पाहू नये त्याऐवजी राम मंदिर बांधण्यासंबंधीचा अध्यादेश आणावा आणि लवकरात लवकर अयोध्येत मंदिराचे काम सुरु करावे. आता जर राम मंदिर बांधले गेले नाही तर लोक आक्रमक होऊ शकतात. त्यानंतर परिस्थिती चिघळली तर ती सर्वस्वी जबाबदारी सरकारची असेल असेही त्यांनी म्हटले होते. आज पुन्हा एकदा लवकरात लवकर राम मंदिराच्या निर्मितीसाठी अध्यादेश आणला जावा अशी मागणी त्यांनी केली आहे.