18 October 2018

News Flash

आतल्या आवाजावर सूरतमधील निकालांचे भविष्य

ग्राहकांच्या वर्दळीने सतत गजबजत असलेला सूरती बाजार सध्या शांत आहे.

ग्राहकांच्या वर्दळीने सतत गजबजत असलेला सूरती बाजार सध्या शांत आहे. नोटाबंदी आणि त्यानंतर लागू झालेला जीएसटी यामुळेच मंदी आलीय, असे येथील व्यापारी बिनदिक्कत सांगतात. त्यासाठी ते काही महिन्यांपूर्वी रस्त्यावरही उतरले होते. त्यांच्या संघटना आजही अधिकृतपणे जीएसटीच्या अंमलबजावणीतील त्रुटी सांगतात. पाटीदार आरक्षणाला सरकारने केलेल्या विरोधाचा रागही हार्दकि पटेलच्या सभांना लोटलेल्या गर्दीमधून दिसत आहे. असे असले तरी मतदान केंद्रांमध्ये ईव्हीएमसमोर उभे राहिल्यावर आतून येणारा आवाजच सूरत आणि गुजरातमधील राजकारणाची दिशा ठरवणार आहे. हा आतला आवाज केवळ गेल्या काही महिन्यांमधील घडामोडींवर आधारलेला नसेल याची जाणीव बाजारपेठांमधून फिरताना होते.

सूरतमधील सिंथेटिक कपडय़ांच्या बहुमजली घाऊक बाजारांमधून फिरताना पुढील काही महिन्यांत देशभरातील बाजारांमध्ये कोणते कपडे विक्रीला ठेवले जाणार याचा अंदाज येतो. आपल्या साडीचे डिझाइन इतरांपेक्षा वेगळे आहे, असे मिरवणाऱ्या स्त्रियांना येथे हजारो यार्डच्या ताग्यातील साडय़ा पाहून भोवळच येईल. लग्नसराईच्या दोन महिने आधी तर इथे पाय ठेवायलाही जागा मिळत नाही, पण सध्या हा बाजार अगदी ओस पडण्याइतपत शांत आहे. काचेपलीकडे आपापल्या गल्ल्यांवर हिशेबाची वही उघडून पाहण्यापलीकडे व्यापाऱ्यांना सध्या काही काम नाही. राधा कृष्ण टेक्सटाइल मार्केट (आरकेटीएम) हे येथील सर्वात मोठय़ा मॉलपकी एक. येथे साधारण दीड हजार गाळे आहेत. असे साधारण शंभर-सव्वाशे बाजार या परिसरात आहेत. साधारण ७० हजार व्यापारी आहेत आणि दिवसाला शंभर ते दीडशे कोटी रुपयांचा व्यवहार येथे होतो, असा अंदाज आहे. पण जीएसटीनंतर २२ दिवस हा बाजार बंद होता. तो अजूनही सावरलेला नाही. जीएसटी हा अत्यंत घाईघाईत, विचार न करता लावण्यात आला. त्यामुळे ५० टक्के धंदा बसलाय. या बाजारावर देशभरातील आणखी दीड लाख व्यापारी अवलंबून आहेत. गेल्या आíथक वर्षांत अपेक्षित करापेक्षा अधिक कर सूरतने भरला आहे. केवळ रोखीने व्यवहार करतो म्हणून तो लगेच काळा होत नाही, असे ऑल इंडिया टेक्सटाइल ट्रेडर फेडरेशनचे अध्यक्ष ताराचंद कासट म्हणाले. ते येथील काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचारही करीत आहेत.

वादळामुळे अपेक्षित ग्राहकांनीही दोन दिवस येणार नसल्याचे कळवले. नोटाबंदीने चार महिने घाम फोडला आणि आता जीएसटीने वाट लावली, असे आरकेटीएममधील आदर्श सेंटरच्या अमरलाल जैन यांनी सांगितले. माझ्याकडे जीएसटी क्रमांक आहे. पण माझे बहुसंख्य ग्राहक हे हैदराबाद, केरळमधून येतात. धड शिकलेले नाहीत आणि जीएसटी वगरे त्यांच्या कल्पनेपलीकडचे आहे. त्यांच्याकडे क्रमांक नसल्याने माझा व्यवहार ठप्प झालाय. पण असे चढउतार येत असतात. शेवटी व्यवसाय टिकणे महत्त्वाचे आणि व्यवसायाला प्रोत्साहन देणाऱ्यांच्या पाठीशीच आम्ही उभे राहणार, असे जैन यांनी स्पष्ट केले. जीएसटीवर व्यापाऱ्यांनी व्यक्त केलेल्या रोषानंतर सरकारी पातळीवर विद्युतवेगाने हालचाली होऊन त्यांची समजूत काढण्यात आली. निवडणुकांपूर्वी जीएसटीचा भार थोडा हलका करण्यात आला. जीएसटीबाबत कोणतीही शंका असल्यास थेट प्रमुख अधिकाऱ्याशी संपर्क साधण्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक सर्व व्यापाऱ्यांना देण्यात आला. या सगळ्याचे परिणाम व्यापाऱ्यांशी बोलताना जाणवत होते. कमलेश सिल्क सेंटरच्या अभिषेक जैन यांना तर जीएसटी ही समस्याच वाटत नाही. उलट उधारीवर माल नेणाऱ्यांकडून फसवणूक होणार नाही, असे ते म्हणाले. बाजारात मंदी आहे. पण लग्नाच्या मोसमासाठी दोन महिन्यांपूर्वी बाजारातून माल नेण्यात आला. या वेळी धंदा मंद असतोच तो थोडा जास्त थंडावलाय. त्याचे विशेष काही नाही, असे त्यांनी सांगितले. या बाजारात उत्तर प्रदेश, बिहारमधून आलेले हजारो मजूर काम करतात. ताग्यातील कापड दोन-दोन मीटरमध्ये कापण्याचे त्यांचे कामही आता मंदावले आहे. कितीही मंदी आली, कितीही विरोध झाला, कोणी काही सांगितले तरी येथे काही बदलणार नाही.. मीटरच्या बारमध्ये कापड लावताना येथील कामगार सहजपणे सांगतात. भांडणे तर नवरा-बायकोमध्येही होतात. पण म्हणून कोणी लगेच काडीमोड देत नाही. विचार बदलत असतात, पण मतदान यंत्रासमोर उभे राहिल्यावर जो आतला आवाज येतो त्यावरच कोणते बटण दाबायचे ते ठरते, असे शेअर रिक्षामधून प्रवास करताना येथील व्यापाऱ्याने सांगितले.

हार्दिकच्या सभांना गर्दी

हार्दकि पटेलच्या सभेला सूरतमध्ये तुफान गर्दी झाली होती. साधारण लाखभर लोक हार्दकिला पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी जमले होते. याचा काँग्रेसला फायदा मिळण्याची शक्यता आहे. मात्र हार्दकिच्या सभांची तुलना मोदींशी होऊ शकत नाही, असे भाजप कार्यकर्त्यांना वाटते. हार्दकि नवा आहे. तो काय सांगतो हे ऐकण्यासाठी लोक गर्दी करतात. ते त्याला मत देतीलच, असे नाही. सूरतमधील लाखभर गर्दी पाच-सहा मतदारसंघातील एकत्रित आहे. ही सर्व मते मिळतील असे गृहीत धरले तरी ही मते विभागली जाणार. एखाद्या जागेवर फायदा होईलही. पण मोदींच्या सभेला गेले नाहीत तरी लोक टीव्हीवरून ते ऐकतात. त्यामुळे केवळ सभांवरून मतदानाची कल्पना येणार नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला.

भाजपला जागा राखण्याचे आव्हान

गेल्या वेळी सूरतमधील १६ जागांपकी १५ जागा भाजपने तर मांडवी ही एकमेव जागा काँग्रेसने जिंकली होती. सूरतमधील व्यापाऱ्यांपेक्षा ग्रामीण भागातील शेतकरी कातावले आहेत आणि ज्या वेगाने व्यापाऱ्यांची समजूत काढण्यात आली त्याप्रमाणे शेतकऱ्यांकडे कोणी लक्ष दिले नाही. उत्तर प्रदेशमधील नेतेही या ठिकाणी प्रचाराला येत आहेत. त्याचा प्रभावही निवडणुकीत काही प्रमाणात दिसू शकेल.

First Published on December 8, 2017 2:43 am

Web Title: bjp in surat for gujarat legislative assembly election 2017