वादग्रस्त वक्तव्यांसाठी कायमच चर्चेत असणारे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांनी ट्विटरवर उपस्थित केलेल्या काही प्रश्नांमुळे सोमवारी नव्या वादाला तोंड फुटले. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना उद्देशून केलेले भाषण आणि बोधगयामधील स्फोट यांचा काही संबंध आहे का, याचा शोध घेतला पाहिजे, अशा आशयाचे ट्विट दिग्विजयसिंह यांनी केल्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटले.
ट्विटरवर दिग्विजयसिंह यांनी म्हंटले आहे की, अयोध्येमध्ये भव्य मंदिर उभारण्याचे आश्वासन अमित शहा यांनी दिलेय. मोदींनी बिहारमधील भाजपच्या कार्यकर्त्यांना उद्देशून केलेल्या भाषणात नितीशकुमार यांना धडा शिकवण्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्याच्या दुसऱयाच दिवशी बोधगयामध्ये बॉम्बस्फोट झाले. त्या वक्तव्याचा आणि स्फोटांचा काही संबंध आहे का, हे मला माहिती नाही. राष्ट्रीय तपास यंत्रणेला त्यांचा तपास पूर्ण करू द्या.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप धर्मांध राजकारण करण्याच्या प्रयत्नात असल्याची टीका दिग्विजयसिंह यांनी केली. भाजपच्या या कृत्यांमुळे नितीशकुमार यांच्यासह बिगर भाजप सरकार असलेल्या सर्व राज्यांनी अधिक सावध राहण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 8, 2013 3:49 am