भाजपावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निशाणा साधला आहे. भाजपा हा पक्ष इतिहास बदलणारा, नावं बदलणारा, नोटा बदलणारा, संस्था बदलणारा पक्ष आहे. मात्र हा पक्ष गेम चेंजर नाही. त्यांच्यामुळे देश संकटात सापडला आहे अशी घणाघाती टीका ममता बॅनर्जी यांनी केली आहे. एवढंच नाही तर भाजपाचे नेते असे वागत आहेत की त्यांच्यामुळेच देशाला स्वातंत्र्य मिळाले. पण स्वातंत्र्याची चळवळ जेव्हा सुरु होती तेव्हा भाजपाचे अस्तित्त्वही नव्हते अशी टीकाही ममता बॅनर्जींनी केली.

 

सीबीआयचं जे प्रकरण गाजतं आहे त्यावरूनही ममता बॅनर्जींनी टीका केली. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सीबीआयला त्यांच्या राज्यात मज्जाव केला आहे आणि ही गोष्ट योग्यच आहे असे ममता बॅनर्जींनी म्हटले आहे. ममता बॅनर्जी यांनी याआधीही भाजपावर अनेकदा निशाणा साधला आहे. मात्र यावेळी ममता बॅनर्जी यांनी भाजपाची सत्ता येणार नाही असेच म्हटले आहे. कारण भाजपा हा पक्ष गेम चेंजर नाही असे त्यांनी आपल्या वक्तव्यातून सुचित केले आहे. आता त्यांच्या या आरोपांना भाजपाकडून काय उत्तर मिळणार ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.