बिहारमध्ये महाआघाडीतून बाहेर पडून भाजपसोबत घरोबा करणाऱ्या नितीशकुमार यांच्यावर समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी निशाणा साधला. डीएनएबद्दल बोलणारेच एनडीएमध्ये (भाजपप्रणित रालोआ) जातात असा टोला अखिलेश यादव यांनी लगावला आहे.

बिहारमधील राजकीय घडामोडी आणि समाजवादी पक्षाच्या दोन आमदारांनी दिलेला राजीनामा या पार्श्वभूमीवर अखिलेश यादव यांनी पत्रकारांशी संवाद साधला. डीएनएवर बोलणारेच भाजपप्रणित एनडीएत (रालोआ) जातात असा टोला त्यांनी लगावला. तर बुक्कल नवाब आणि यशवंत सिंह यांच्या राजीनाम्यावर अखिलेश म्हणाले, भाजपला फोडाफोडीच्या राजकारणाची गरज का लागली. बिहारपासून ते उत्तर प्रदेशपर्यंत भाजप भ्रष्टाचाराने माखल्याचा आरोप त्यांनी केला. जनता हे सगळं बघत आहे असेही त्यांनी सांगितले.

बुक्कल नवाब यांनी राजीनामा का दिला असा प्रश्न विचारला असता अखिलेश म्हणाले, ईदला नवाब आमच्यासोबत होते. जर भाजपने त्यांना डांबून ठेवले नसेल तर मी एकदा त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करेन असे यादव यांनी स्पष्ट केले. उत्तर प्रदेशमधील शिक्षण सेवकांवर अन्याय होत असून त्यांना सरकारने ५० लाख रुपयांची भरपाई दिली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.

अमित शहा उत्तर प्रदेश दौऱ्यावर पोहोचले असतानाच समाजवादी पक्षाच्या दोन आमदारांनी शनिवारी राजीनामा दिला. विधान परिषदेतील आमदार बुक्कल नवाब आणि यशवंत सिंह या दोघांनी राजीनामा दिला असून दोघेही भाजपमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. समाजवादी पक्षाचे नाव बदलून समाजवादी आखाडा असे ठेवले पाहिजे अशी टीका त्यांनी केली होती. बसपच्या एका आमदारानेदेखील राजीनामा दिला असून या घडामोडींमुळे उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण तापले आहे.