गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीत नव्या कृषी कायद्यांना मागे घेण्यासाठी शेतकऱ्यांचं आदोलन सुरू आहे. तर दुसरीकडे सरकार हे नवे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे असल्याचं म्हणत या कायद्यांवर ठाम आहे. अशातच शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. “भाजपाच देशातील खरी तुकडे तुकडे गँग आहे,” असा आरोप त्यांनी केला आहे. तसंच शेतकरी आंदोलादरम्यान देशाला तोडण्याचं काम त्यांनी केलं असल्याचंही बादल म्हणाले.

“भाजपानं राष्ट्रीय एकतेला तुकड्यांमध्ये तोडलं आहे. त्यांनी हिंदूंना मुस्लीमांविरोधात भडकावलं आहे. आता ते शिख बांधवांबद्दलही तसंच करत आहेत. देशभक्ती असलेल्या पंजाबला भाजपा सांप्रदायिकतेच्या आगीत ढकलत आहे,” असंही बादल यांनी नमूद केलं.

“आपण जय जवान जय किसान असं म्हणतो. आज जवानही आंदोलनात सहभागी झाले आहेत आणि शेतकरीही. तुम्हाला नक्की काय हवं आहे? भाजपा सरकारनं आपल्या अहंकारातून मागे हटून शेतकऱ्यांशी चर्चा केली पाहिजे,” असंही ते म्हणाले. ज्यांनी नवा कायदा तयार केला त्यांनी आयुष्यात कधी शेती केली नाही. केंद्रातील मोदी सरकार हे अधिकाऱ्यांच्या इशाऱ्यावर चालत आहे. मोदी सरकार लोकांना धर्माच्या आधारावर विभागण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

“जे सरकारच्या बाजूनं असतात त्यांना देशभक्त ठरवलं जातं आणि जे सरकारच्या बाजूनं नसतात त्यांना तुकडे तुकडे गँग म्हटलं जातं. खरी तुकडे तुकडे गँग भाजपा आहे. त्यांनी यापूर्वी हिंदू आणि मुस्लीमांच्या संबंधांचे तुकडे केले,” असंही बादल म्हणाले.