काश्मीरमधल्या अशांत परिस्थितीला व वाढलेल्या दहशतवादाला भाजपाही जबाबदार असल्याचा आरोप एमआयएमच्या असदुद्दिन ओवेसींनी केला आहे. जम्मू व काश्मिरमधली परिस्थिती संपूर्णपणे नियंत्रणाबाहेर असून त्यासाठी केवळ पीडीपीला व मेहबुबा मुफ्तींना जबाबदार धरता येणार नाही असं ओवेसी म्हणाले आहेत.

काश्मीरमध्ये दहशतवाद प्रचंड वाढला असून रमजानमध्ये सरकारने शस्त्रसंधी जाहीर करूनही दहशतवादी कारवायांचं प्रमाण आटोक्यात न आल्याचं कारण देत व त्याला पीडीपीला जबाबदार धरत भाजपानं सरकारचा पाठिंबा काढून घेतला. यामुळे जम्मू व काश्मिरमध्ये राजकीय भूकंप झाला असून राज्यात निर्नायकी स्थिती निर्माण झाली आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना ओवेसी म्हणाले की रमजानच्या महिन्यात शस्त्रसंधी करण्याचा निर्णय अत्यंत घिसाडघाईत घेण्यात आला होता. त्यासाठी व कायदा सुव्यवस्थेसाठी भाजपानं केवळ पीडीपीला जबाबदार धरलं असून भाजपाच्या नेत्यांना त्यांची जबाबदारी कळायला हवी असं ओवेसी म्हणाले.

काश्मिरमध्ये सरकारात भाजपाचे मंत्री होते, उपमुख्यमंत्रीही भाजपाचा होता, त्यामुळे केवळ पीडीपाला दोष देता येणार नाही असे त्यांनी सांगितले. खरंतर काश्मिरच्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यास पीडीपी व भाजपाचं सरकारअपयशी ठरले असल्याचा आरोप ओवेसींनी केला. त्याचप्रमाणे पंतप्रधान मोंदीनी व मुख्यमंत्री मुफ्तींनी मोठमोठी आश्वासनं दिली होती, त्याची आठवण करून देत त्यांचं काय झालं असा सवालही ओवेसींनी उपस्थित केला आहे.