भाजपामुळे देशाची अवस्था लाजिरवाणी झाली आहे अशी टीका ज्येष्ठ लेखिका अरुंधती रॉय यांनी दिल्लीतील जंतरमंतर या ठिकाणी झालेल्या आंदोलनादरम्यान केली. तीन वर्षांपासून जेएनयु अर्थात जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील नजीब अहमद हा विद्यार्थी बेपत्ता आहे. त्याचा शोध घेण्यात दिल्ली पोलीस, एनआयए, सीबीआय या सरकारी संस्था अपयशी ठरल्या. त्यामुळेच या विद्यापीठातील आणि इतर काही विद्यापीठांतील विद्यार्थ्यांनी जंतरमंतर या ठिकाणी आंदोलन केलं. या आंदोलनाला अरुंधती रॉय यांनी हजेरी लावली होती. त्याचवेळी त्यांनी ही टीका केली.

या आंदोलनाला चारशेपेक्षा जास्त विद्यार्थी हजर होते. इतकंच नाही तर नजीबची आई फातिमा नफीस, गौरी लंकेश यांची बहीण कविता लंकेश, मॉब लिंचिंगमध्ये मारल्या गेलेल्या तरबेझ अन्सारीची पत्नी शैस्ता परवीन आणि उत्तर प्रदेशातील हिंसाचारात मारले गेलेले पोलीस अधिकारी सुबोध कुमार यांच्या पत्नी रजनीही हजर होत्या. यावेळी अरुंधती रॉय यांनी मोदी सरकारवर टीका केली.

” भाजपाच्या काळात देश आर्थिकबाबतीत पिछाडीवर गेला आहेच, शिवाय न्यायव्यवस्था, शिक्षण, पत्रकारिता, मानवाधिकार, संरक्षण या सगळ्याच क्षेत्रात देशाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. हिंदुत्ववादी विचार पसरवण्यासाठी सगळ्या पातळ्यांवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न होतो आहे. मुस्लिम समाजाला हेतुपुरस्सर लक्ष्य केलं जातं आहे. देशातील सध्याचे वातावरण अत्यंत लाजिरवाणे असून आपला देश महान ठरत नाही” असं त्या म्हणाल्या. भारतीय संविधानानुसार देशाचा कारभार सुरु झाला तर पुन्हा एकदा हा देश रुळावर येईल, महान ठरेल. मात्र सध्या अशी स्थिती नाही असंही त्या म्हणाल्या. एवढंच नाही तर हे सरकार आगामी काळात राष्ट्रीय नागरिकत्त्व कायदा लागू करु शकतं असाही अंदाज त्यांनी वर्तवला.

याआधी ऑगस्ट महिन्यात पाकिस्तानबाबत बोलताना अरुंधती रॉय यांनी एक वक्तव्य केलं होतं. पाकिस्तानमध्ये लष्कराचा वापर हा देशातील जनतेविरोधात केला जात नाही असं त्या म्हणाल्या होत्या. त्यांच्या या वक्तव्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांच्यावर चांगलीच टीका केली होती.