पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर हिंसाचार उफाळला आहे. भाजपा आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. या हिंसाचारात कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्याचा दावा भाजपानं केला आहे. त्यानंतर भाजपाच्या पश्चिम बंगाल युनिटनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट टाकली आहे. त्या व्हिडिओत चुकीचा फोटो वापरल्याने मोठी नाचक्की झाली आहे. भाजपा कार्यकर्ता माणिक मोईत्रा याच्याऐवजी इंडिया टुडेचा पत्रकार अभ्रो बॅनर्जी याचा फोटो लावला होता.

पत्रकार अभ्रो बॅनर्जी यांना अनेक फोन आल्यानंतर त्यांना ही बाब लक्षात आली. त्यांना सर्वप्रथम काय झालं हे समजलंच नाही. त्यानंतर भाजपाच्या आयटी सेलने व्हिडिओत त्यांचा फोटो लावल्याचं लक्षात आलं. ५ मिनिटं २८ सेकंदाचा व्हिडिओ बुधवारी अपलोड करण्यात आला होता. हा व्हिडिओ १२ हजाराहून अधिक लोकांनी पाहिला होता. या व्हिडिओनंतर मनस्ताप झाल्याने अभ्रो बॅनर्जी यांनी ट्वीट करुन जिवंत असल्याचं सांगितलं.

‘मी अभ्रो बॅनर्जी, मी सुखरूप असून जिवंत आहे. सीतालकुचीपासून १३०० किमी दूर आहे. भाजपा आयटी सेलने मी माणिक मोईत्रा असल्याचा दावा केला आहे. कृपया या खोट्या पोस्टवर विश्वास ठेवू नका. मी पुन्हा सांगतो. मी जिवंत आहे’, अशी पोस्ट अभ्रो बॅनर्जी यांनी ट्विटरवर पोस्ट केली आहे.

Video : पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन यांच्या ताफ्यावर हल्ला; भाजपाकडून घटनेचा निषेध!

बंगालमधील हिंसाचारानंतर भाजपाने मृत व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. त्यात मोमिक मोईत्रा, मिंटू बर्मन यांची नावं आहे. मात्र माणिक मोईत्रा नावाचं कुणीही व्यक्ती नाही. वादानंतर भाजपाने हा व्हिडिओ डिलीट केला आहे. मात्र तत्पूर्वी हा व्हिडिओ अनेकांनी पाहिला होता. .