कर्नाटकमध्ये पोटनिवडणुकीत  १५ पैकी १२ जागांवर विजय

महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष ठरूनही सत्तेपासून वंचित राहिलेल्या भाजपला कर्नाटकमध्ये मोठा दिलासा मिळाला. कर्नाटकमधील पोटनिवडणुकीत भाजपने १५ पैकी १२ जागांवर विजय मिळवल्याने येडीयुरप्पा सरकारने बहुमत कायम राखले.

काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या १७ आमदारांनी तत्कालीन कुमारस्वामी सरकारविरोधात बंड केल्याने जुलैमध्ये कर्नाटकात राजकीय नाटय़ रंगले होते. त्यामुळे सत्तेत आलेल्या भाजपला बहुमत राखण्यासाठी पोटनिवडणुकीत १५ पैकी किमान सहा जागा जिंकणे आवश्यक होते. अखेर पोटनिवडणुकीत १२ जागा जिंकल्याने येडीयुरप्पा सरकार तरले. या निकालामुळे २२३ सदस्य असलेल्या कर्नाटक विधानसभेत भाजपचे संख्याबळ ११७ झाले आहे. दोन जागांबाबत न्यायालयात खटला सुरू आहे.  होसकोट मतदारसंघात भाजप बंडखोर शरद बचेगौडा यांनी विजय मिळवला. भाजपमधून त्यांना निलंबित करण्यात आले होते. काँग्रेसला दोनच जागा जिंकता आल्या. धर्मनिरपेक्ष जनता दलाकडे असलेल्या तीनपैकी एकाही जागेवर पक्षाला यश मिळवता आलेले नाही.

वोक्कलिग प्रभावक्षेत्रात यश

कर्नाटकातील वोक्कलिग समाजाचा प्रभाव असलेल्या मंडय़ा जिल्ह्य़ात भाजपला प्रथमच यश मिळाले आहे. मंडय़ा जिल्ह्यातील कृष्णराजपेट मतदारसंघात भाजपचे नारायण गौडा यांनी धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या बी.एल. देवराज यांचा ९७०० हून अधिक मतांनी पराभव केला. या मतदारसंघात अनेक दशके काँग्रेस व जद (धर्मनिरपेक्ष) या पक्षांचे वर्चस्व राहिले आहे.

अकरा दलबदलू विजयी

पोटनिवडणुकीतील निकालाचे वैशिष्टय़ म्हणजे १३ दलबदलूंपैकी ११ जण पुन्हा विजयी झाले आहेत. केवळ एच. विश्वनाथ व एम. बी. टी नागराज हे दोघे पराभूत झाले. या आमदारांना मंत्रिपद देण्याचे आश्वासन पाळण्यात येईल, असे येडियुरप्पा यांनी सांगितले.

काँग्रेसमध्ये राजीनामासत्र

पराभवाची जबाबदारी स्वीकारून कर्नाटक काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते सिद्धरामैय्या व प्रदेशाध्यक्ष दिशेन गुंडु राव यांनी सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा दिला. निवडणुकीतील ‘असमाधानकारक कामगिरी’मुळे राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले.

काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षाने कर्नाटकमध्ये जनादेशाचा अवमान केला. मतदारांनी पोटनिवडणुकीत या पक्षांना धडा शिकवला असून, स्थिर सरकारला कौल दिला आहे.   नरेंद्र मोदी, पंतप्रधान