उत्तर प्रदेशमध्ये २०२२ मध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. आम आदमी पक्षानं आतापासूनच यासाठी कंबर कसली असून आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका लढण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या निर्णयानंतर भाजपानं आपला जोरदार टोला लगावला आहे.

“दोन कोटी लोकसंख्या असलेली दिल्ली सांभाळली जात नाही. तर दुसरीकडे २४ कोटी लोकसंख्या असलेलं उत्तर प्रदेश सांभाळण्याच्या गोष्टी सुरू आहेत. ही गोष्ट करणारा पक्ष स्वप्नच पाहत आहे,” असं म्हणत उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी आपला टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातू आपली प्रतिक्रिया दिली. यापूर्वी केजरीवाल यांनी आम आदमी पक्ष हा उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका लढणार असल्याची घोषणा केली होती.

आणखी वाचा- आम आदमी पार्टी उत्तर प्रदेशच्या निवडणुकांमध्ये उतरणार

काय म्हटलं होतं केजरीवालांनी?

“उत्तर प्रदेशात प्रत्येक पक्षाचं सरकार आलं. परंतु त्यांनी आपली घरं भरण्याशिवाय उत्तर प्रदेशसाठी काहीही केलं नाही. आज छोट्या छोट्या सुविघांसाठी उत्तर प्रदेशच्या नागरिकांना दिल्लीत का यावं लागतं?,” असा प्रश्न केजरीवाल यांनी केला. “उत्तर प्रदेशामधील सर्वच पक्षांनी त्या ठिकाणच्या नागरिकांना धोका दिला आहे. प्रत्येक सरकारनं भ्रष्टाचारात एकदुसऱ्यांवर मात केली आहे. दिल्लीत राहणाऱ्या उत्तर प्रदेशातील नागरिकांनी आम्हाला सांगितलं की दिल्लीप्रमाणेच उत्तर प्रदेशलादेखील प्रत्येक प्रकारचा लाभ मिळाला पाहिजे आणि लोकांचं कल्याणही झालं पाहिजे,” असंही ते म्हणाले.

आज उत्तर प्रदेशात योग्य ध्येय असलेल्या राजकारणाची कमतरता आहे. ते केवळ आम आदमी पार्टीच देऊ शकते. उत्तर प्रदेशच्या चुकीच्या राजकारणानं आणि भ्रष्ट नेत्यांनी उत्तर प्रदेशला विकासापासून दूर ठेवलं. ज्या सुविधा दिल्लीत लोकांना मिळत आहेत त्या आजही उत्तर प्रदेशातील लोकांना मिळत नाहीत. उत्तर प्रदेशात आम आदमी पक्षाचं सरकार आल्यात त्या ठिकाणीही दिल्लीप्रमाणेच विकासाचं मॉडेल लागू केलं जाणार असल्याचं आश्वासन केजरीवाल यांनी दिलं.

आणखी वाचा- “माझ्या विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो”; भाजपा मंत्र्याचं वक्तव्य

यापूर्वी आम आदमी पक्षानं दिल्ली, पंजाब, गोवा आणि हरयाणा विधानसभेच्या निवडणुका लढवल्या होत्या. दिल्ली आणि पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला चांगलं यशही मिळालं होतं. २०२० मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षाला ७० पैकी ६२ जागांवर यश मिळालं होतं. तिसऱ्यांदा दिल्लीत आम आदमी पक्षाचं सरकार आलं आहे.