दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने प्रचारात किरण बेदी आणि नरेंद्र मोदी यांचा प्रतिमेचा पुरेपुर वापर करण्यासाठी विशेष रणनीती आखली आहे. याच रणनीतीचा एक भाग म्हणून दिल्लीतील तरूण मतदारांना आकर्षित करण्यासाठी पक्षाकडून ‘सेल्फी विथ मोदी’ची नवी शक्कल काढण्यात आली आहे. प्रचाराचे हे नवे तंत्र लवकरच अंमलात आणले जाणार असून पक्षाध्यक्ष अमित शहा यांना मोदींबरोबर सेल्फी काढण्याचा पहिला मान मिळाला आहे. त्यांनी शनिवारी दिल्लीतील खान मार्केटमध्ये या मोबाईल अॅप्लिकेशनचे उद्घाटन केले. या मोबाईल अॅपमध्ये ‘ऑगमेटेंड रिअॅलिटी’ या तंत्राचा वापर करून सेल्फी काढला जाणार आहे. नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्यावेळी मतदान केल्यानंतर काढलेला सेल्फी बराच गाजला होता. त्याच लोकप्रियतेचा फायदा उठवत दिल्लीच्या प्रत्येक मतदारसंघात ‘सेल्फी विथ मोदी’च्या सहाय्याने आक्रमक प्रचार करण्याच्या सूचना पक्षाकडून कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार दिल्लीतील मॉल, बाजार अशा गर्दीच्या तब्बल २०० ठिकाणी ‘सेल्फी कॉर्नर’ उभारण्यात आले असून त्याद्वारे तरूण मतदारांना आकर्षित करण्याचा पक्षाचा प्रयत्न राहील.