उत्तर प्रदेशातील भाजपा आमदाराच्या मुलीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला असून वडिलांकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा केला आहे. वडिलांच्या इच्छेविरोधात जाऊन आपण जातीबाहेर लग्न केल्यानेच जीवाला धोका असल्याचं तिने सांगितलं आहे. यावेळी तिने पोलीस सुरक्षा दिली जावी अशी मागणीही केली आहे. २३ वर्षीय साक्षी मिश्रा ही बरेलीमधील भाजपा आमदार राजेश मिश्रा यांची मुलगी आहे. व्हिडीओत साक्षी आपल्या वडिलांचा आणि भावाचा टोपण नाव ‘पप्पू भरतौल’ आणि ‘विकी भरतौल’ असा उल्लेख करताना ऐकू येत आहे.

“माननीय आमदार पप्पू भरतौलजी आणि विकी भरतौलजी…कृपया आम्हाला शांततेत जगू द्या. मी खरंच लग्न केलं आहे. मी फॅशन म्हणून कुंकू लावलेलं नाही”, असं साक्षी मिश्रा व्हिडीओत सांगताना दिसत आहे. साक्षी मिश्रा बोलत असताना एका व्यक्तीने मोबाइल हातात पकडलेला दिसत असून तो तिचा पती असावा असा अंदाज आहे.

साक्षी मिश्राने गेल्या गुरुवारी अजितेश कुमार याच्याशी लग्न केलं आहे. “पप्पा…तुम्ही राजीव राणाप्रमाणे माझ्यामागे गुंड पाठवलेत. मी खरंच आता दमली आहे. आमचा जीव धोक्यात असून, लपण्याचा कंटाळा आला आहे. अभी आणि त्याच्या नातेवाईकांना त्रास देणं थांबवा. मला आनंदी आणि मुक्त राहायचं आहे”. “या व्हिडीओच्या माध्यमातून मला सांगायचं आहे की, भविष्यात जर मला, अभी किंवा त्याच्या कुटुंबाला काही झालं तर यासाठी माझे वडील भाऊ आणि राजीव राणा जबाबदार असतील. जे माझ्या वडिलांना मदत करत आहेत, त्यांनी मदत करणं थांबवा कारण आमचा जीव धोक्यात आहे”, असंही साक्षीने व्हिडीओत सांगितलं आहे.

पुढील एक व्हिडीओ साक्षी मिश्राने पोलिसांनी सुरक्षा द्यावी अशी मागणी केली आहे. दरम्यान भाजपा आमदाराकडून याप्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पोलीस उपनिरीक्षक आर के पांडे यांनी आपल्याला या व्हिडीओसंबंधी कल्पना असून पोलिसांना सुरक्षा देण्यास सांगितलं असल्याची माहिती दिली. पण दांपत्य नेमकं कुठे आहे यासंबंधी माहिती मिळाली नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.