भाजपा खासदार रमा देवी यांच्यावर टिप्पणी करणारे समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांचं शीर कापलं पाहिजे असं वादग्रस्त वक्तव्य भाजपा नेते आफताब अडवणी यांनी केलं आहे. गुरुवारी लोकसभेत तिहेरी तलाक विधेयकावर चर्चा सुरु असताना आझम खान यांनी भाजपा खासदार रमा देवी यांच्यावर टिप्पणी करत म्हटलं की, “तुम्ही मला इतक्या आवडता की तुमच्या डोळ्यात डोळे घालून पाहत राहावंसं वाटतं”. यामुळे सभागृहात भाजपा खासदारांनी आक्षेप घेत गोंधल घालण्यास सुरुवात केली होती.

दरम्यान यावरुन भाजपा नेते आफताब अडवाणी यांनी आझम खान यांच्यावर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “आझम खान यांचं वक्तव्य निषेधार्ह आहे. आम्ही त्याचा निषेध करतो. भारत सरकारला आमची विनंती आहे की, आझम खान यांचं शीर कापून संसेदच्या दरवाजाला टांगण्यात यावं. ज्यामुळे आझम खान आणि ओवेसी सारख्यांना महिलांचा अपमान केल्यास काय परिणाम होतात याची जाणीव होईल”.

“महिलांचा अपमान आता सहन नाही केला गेला पाहिजे. आधी जयप्रदा आणि आता भाजपा खासदारावर त्यांनी अशी टिप्पणी केली आहे. हे निषेधार्ह आहे. मी याआधीही म्हटलं आहे की, हा म्हातारा वेडा झाला आहे. पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे त्यांची हत्या करणं गरजेचं आहे. त्यांच्यापासून आता आपल्य देशाला धोका आहे”, असंही त्यांनी म्हटलं आहे .

यावेळी त्यांनी आझम खान देशातील वातावरण बिघडलत असल्याचा आरोप केला. “आझम खान देशातील वातावरण दूषित करत आहेत. त्यांच्यामुळे महिलांना अपमान सहन करावा लागत आहे. त्यांच्या या अशा वक्तव्यांमुळे दिवसेंदिवस महिलांप्रती असणारा आदर कमी होत असून हे देशासाठी चांगलं नाही”, असं त्यांनी म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण ?

लोकसभेत तिहेरी तलाक विधेयकावर चर्चा सुरु असताना समाजवादी पक्षाचे खासदार आझम खान यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने लोकसभेत गदारोळ झाला. आझम खान बोलण्यासाठी उभे राहिले असता शेर बोलत त्यांनी सुरुवात केली. ‘तू इधर-उधर की ना बात कर…’ अशी सुरुवात केल्यानंतर नंतर जे काही ते बोलले त्यामुळे भाजपा खासदारांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. आझम खान बोलत होते तेव्हा अध्यक्षांच्या खुर्चीवर भाजपा खासदार रमा देवी बसलेल्या होत्या.

आझम खान यांनी रमा देवी यांच्यावर टिप्पणी करत म्हटलं की, “तुम्ही मला इतक्या आवडता की तुमच्या डोळ्यात डोळे घालून पाहत राहावंसं वाटतं”. रमा देवी यांनी यावर आक्षेप घेत ही बोलण्याची पद्धत नाही असं सांगितलं असता आझम खान यांनी तुम्ही खूप आदरणीय आहात, माझ्या बहिणीप्रमाणे आहात असं म्हटलं.

यानंतर भाजपा खासदारांनी गोंधळ घालण्यास सुरुवात करत माफी मागण्यास सुरुवात केली. ओम बिर्ला यांनी पुन्हा एकदा कामकाज हाती घेतल्यानंतर त्यांनीही आझम खान यांना माफी मागण्यास सांगितलं. आक्षेपार्ह भाग कामकाजातून वगळण्यात यावा असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

आझम खान यांनी मात्र माफी मागण्यास नकार दिला. आपण काही चुकीचं बोललो असल्यास राजीनामा देण्यास तयार आहोत असं आझम खान यांनी सांगितलं. यानंतर ते सभागृहातून बाहेर पडले.