सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) हा भाजपाच्या अजेंड्यावरील महत्वाचा विषय असून तो आता अस्तित्वातही आला आहे. मात्र, याला मोठ्या प्रमाणावर विरोध होताना दिसत आहे. त्यातच आता मध्य प्रदेशातील एका भाजपा नेत्याने या कायद्याला जोरदार विरोध दर्शवला आहे. सीएएचा मुस्लिमांबरोबर अनुसुचित जाती, जमाती आणि ओबीसीवरही विपरीत परिणाम होईल, असे या नेत्याने म्हटले आहे. या कायद्याला विरोध करणारा मध्य प्रदेशातील हा दुसरा भाजपा नेता आहे.

आपल्या फेसबूक पोस्टमध्ये भाजपा नेते अजित बोरासी म्हणतात, “राष्ट्रीय नागरिकत्व नोंदवही (एनआरसी) आणि सुधारित नागरिकत्व कायद्याचा (सीएए) केवळ मुस्लिमांनाच नव्हे तर अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांनाही फटका बसणार आहे. एकदा हे नक्कीच वाचा आणि समजून घ्या. मी मेंढरु नाही की जे चुकीच्या गोष्टींमागे चालत राहिलं.” दरम्यान, काही आठवड्यांपूर्वी याच नेत्याने एक पोस्ट करीत सीएएला पाठिंबा दर्शवला होता. त्यांनी म्हटलं होतं की, “माझ्या माहितीप्रमाणे हा कायदा कोणत्याही भारतीयाविरोधात नाही.” इंडियन एक्स्प्रेसने याबाबत वृत्त दिले आहे.

बोरासी यांनी गेल्या वर्षी मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणूक भाजपाच्या तिकीटावर उज्जैन जिल्ह्यातील अलोट येथून लढवली होती. त्यांचे वडील प्रेमचंद गुड्डू हे पूर्वी काँग्रेसचे उज्जैन येथील खासदार होते. या माजी खासदाराच्या मुलाने नंतर आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपात प्रवेश केला होता.

दरम्यान, जानेवारी महिन्यांत भाजपाचे आमदार नारायण त्रिपाठी यांनी सीएए विरोधात भाष्य केलं होतं. “देशासाठी हा कायदा धोकादायक असल्याचे त्यांनी म्हटले होते. एकतर आपण घटनेचे अनुसरण करा किंवा ते फाडून टाका. कारण, ते धर्मनिरपेक्षतेवर जोर देते आणि देश धार्मिक आधारावर विभागला जाऊ शकत नाही. यामुळे ग्रामीण भागातील मुस्लिमांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले असून ते इतरांशी संवाद टाळत आहेत” असेही त्यांनी म्हटले होते.