जम्मू काश्मीरमधील बंदीपोरा येथे दहशतवाद्यांनी भाजप नेते शेख वसीम, त्यांचे वडिल आणि त्यांचा भाऊ यांना गोळ्या घालून हत्या केल्याची घटना घडली. बांदीपोरा येथे दहशतवाद्यांनी भाजपा कार्यकर्ता वसीम बारी यांच्यावर गोळीबार केला. अंदाधुंद केलेल्या गोळीबारात वसीम बारी, त्यांचे वडील बशीर अहमद आणि त्याचा भाऊ उमर बशीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु त्या ठिकाणी तिघांचाही मृत्यू झाला. यावर केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते प्रकाश जावडेकर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. हे भ्याड कृत्यू असून दहशतवाद संपेपर्यंत ही लढाई सुरूच राहिल असं मत त्यांनी व्यक्त केलं.
“जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा येथे भाजपा नेते शेख वसीम, त्यांचे वडील व भाऊ यांच्या हत्येचा आम्ही तीव्र निषेध करतो. हे भ्याडपणाचं कृत्य आहे. दहशतवाद संपेपर्यंत हा लढा सुरूच राहिल,” असं जावडेकर म्हणाले. त्यांनी ट्विटरवरून आपली प्रतिक्रिया देत या घटनेचा निषेध केला.
जम्मू और कश्मीर के बांदीपोरा में बीजेपी के नेता शेख वसीम बारी, उनके पिता और भाई की हत्या की हम कड़ी भर्त्सना करते है। यह कायरता का कृत है। आतंकवाद समाप्त होने तक यह लड़ाई चालू रहेगी।
— Prakash Javadekar (@PrakashJavdekar) July 9, 2020
शेख वसीम हे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष होते आणि आपल्या कुटुंबीयांसोबत एका दुकानाजवळ बसले होते. त्याचवेळी अचानक आलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर अंधाधुंद गोळीबार केला. ही घटना ज्यावेळी घडली त्यावेळी त्यांच्यानजीक कोणीही नव्हतं. तसंच सुरक्षा रक्षकही उपस्थित नव्हता. वसीम यांना सुरक्षा पुरवण्यात आली होती. परंतु घटनेदरम्यान त्या ठिकाणी कोणीही उपस्थित नव्हतं. दरम्यान, जम्मू काश्मीर पोलिसांनी खासगी सुरक्षा अधिकाऱ्यांना आपलं कर्तव्य योग्यरित्या न बजावल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
“वसीम यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आठ सदस्यीय सुरक्षा टीम पुरवण्यात आली होती. परंतु घटनेदरम्यान त्यांच्यापैकी कोणीही उपस्थित नव्हतं,” अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनं जम्मू काश्मीरचे पोलीस डीजीपी दिलबाग सिंग यांच्या हवाल्यानं दिली. या घटनेनंतर जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीदेखील शोक व्यक्त केला. तसंच भाजपाचे ज्येष्ठ नेते राम माधव यांनीदेखील या घटनेचा निषेध केला. “बांदीपोरामध्ये भाजपा नेते वसीम बारी आणि त्यांच्या भावाच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हत्येमुळे आम्हाला दु:ख झालं आहे. ८ सुरक्षा रक्षक असतानाही अशी घटना घडली. त्यांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त करतो,” असं राम माधव म्हणाले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 9, 2020 8:32 am