News Flash

‘करोना झाल्यावर ममतांना मिठी मारेन’ म्हणणारा भाजपा नेता निघाला पॉझिटिव्ह

माध्यमांशी बोलताना केलं होतं वादग्रस्त वक्तव्य

संग्रहित छायाचित्र/financialexpress

देशात करोना विषाणूनं थैमान घातलं असून, दिवसेंदिवस संसर्ग होणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत चालली आहे. राजकीय नेते व मंत्रीही याला करोनाच्या थैमातून सुटलेले नाहीत. काही दिवसांपूर्वी भाजपाचे नेते राष्ट्रीय सचिव आणि माजी खासदार अनुपम हाजरा यांनी “आपल्याला करोना झाल्यास मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मिठी मारेन” असं म्हटलं होतं. त्यामुळे ते वादात अडकले होते. मात्र, आता त्यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

भाजपाचे नवनियुक्त राष्ट्रीय सचिव व माजी खासदार अनुपम हाजरा यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करताना वादग्रस्त विधान केलं होतं. त्यामुळे ते बरेच चर्चेतही आले होते. “मला कोरोनाची लागण झाली तर मी ममता बॅनर्जी यांना मिठी मारेन”, असं वक्तव्य त्यांनी केले होतं.

गेल्या आठवड्यात पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगना जिल्ह्यातील बरईपूर येथे भाजपा कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात उपस्थित कार्यकर्त्यांपैकी बऱ्याच जणांनी चेहऱ्यावर मास्क लावला नव्हता. या बैठकीनंतर अनुपम हाजरा यांना पत्रकारांनी याबाबत प्रश्न विचारला असता त्यावर उत्तर देताना ते म्हणाले की “आमचे कार्यकर्ते करोनापेक्षा जास्त मोठ्या संकटांशी लढत आहेत. ते ममता बॅनर्जी यांच्याविरोधात लढत आहेत. ते करोना महामारीनं प्रभावित झालेले नाहीत. त्यांना कुणाचीही भीती वाटत नाही.”

हाजरा म्हणाले होते, “जर मला करोनाची लागण झाली, तर मी ममता बॅनर्जी यांना मिठी मारेन. कारण या संकटात त्यांनी करोनाबाधितांना खूप चुकीची वागणूक दिली आहे. करोनाबाधित मृतदेहांवर रॉकेल टाकून जाळलं आहे. अशा प्रकारची वर्तवणूक आपण कुत्रे आणि मांजरींसोबतदेखील करत नाही”, असा आरोप हाजरा यांनी केला होता. दरम्यान हाजरा यांच्या वक्तव्यानंतर तृणमूल काँग्रेसने त्यांच्याविरोधात खटला दाखल केला होता. मात्र, आता त्यांना करोना झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हाजरा चर्चेचा विषय ठरले आहेत.

कोण आहेत हाजरा?

अनुपम हाजरा बोलपूर मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांच्या पक्षविरोधी कामांमुंळे पक्षाने त्यांची हकालपट्टी केली होती. त्यांनी भाजपाकडून २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत जादवपूरमधून निवडणूक लढवली होती. परंतु या निवडणुकीत त्यांचा मोठा पराभव झाला होता. आता भाजपानं त्यांच्यावर राष्ट्रीय सचिवपदाची जबाबदारी सोपवली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 2, 2020 9:12 pm

Web Title: bjp leader anupam hajra who said hug to mamata banrjee tested covid 19 positive bmh
Next Stories
1 हाथरस प्रकरण :पोलीस अधीक्षकांसह तीन अधिकारी निलंबित; योगी सरकारची मोठी कारवाई
2 हाथरस प्रकरण: “माझा पोरगा दोषी असेल, तर त्याला गोळी घाला पण…”
3 हाथरस प्रकरणामुळे योगी सरकारसह भाजपाची प्रतिमा मलीन झाली-उमा भारती
Just Now!
X