माजी केंद्रीय मंत्री अरूण शौरी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. केंद्र सरकारविरोधात महाआघाडीसाठी कुठल्याही चेहऱ्याची आवश्यकता नाही, असे म्हणत सन १९७७ मध्येही इंदिरा गांधींविरोधात एकही चेहरा नव्हता. पण तरीही त्यांचा पराभव झालाच. त्यामुळे मोदींच्या पराभवासाठी चेहऱ्याची गरज नाही, असे त्यांनी म्हटले. तसेच मोदींमुळे विरोधकांमध्ये एकता दिसून येत आहे. पण २०१९ च्या निवडणुकीत भाजपाविरोधात आघाडी स्थापन करण्यास ही वेळ योग्य नाही, असा सल्लाही त्यांनी विरोधकांना दिला. कोणत्याही राजकीय पक्षाच्या तुलनेत राजकारण खूप मोठं असतं, असेही शौरी यांनी स्पष्ट केले.

‘एनडीटीव्ही’शी ते बोलत होते. तब्बल २५ वर्षांनंतर बसप-सपा एकत्र आल्यामुळे उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीत भाजपाचा पराभव झाला. याबाबत शौरी म्हणाले की, विरोधी पक्षांनी एकमेकांशी हातमिळवणी केली पाहिजे. शौरी हे एकेकाळी मोदींचे प्रशंसक होते.

मोदींनी विरोधी पक्षाविरोधात सुरू केलेल्या अभियानाविरोधात त्यांनी टीका केली. विरोधकांना एकत्र आणण्यासाठी मोदी कठोर मेहनत घेत आहेत. तुमच्यातील प्रत्येकाला नेस्तनाबूत केले जाईल, असे मोदींनी विरोधकांना सांगून टाकले आहे. तुम्ही सर्वजण एकत्र आला नाहीत तर तुम्हाला आमच्यापासून धोका राहील, असेही त्यांनी विरोधकांना सुनावले आहे. विरोधी पक्षच नाही तर भाजपाच्या सहकारी पक्षांनाही मोदी पुन्हा एकदा सत्तेत आले तर त्यांचेही पतन होईल, असे वाटत असल्याचा दावाही त्यांनी केला.