पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केलेल्या तीन नव्या शेतकरी कायद्यांविरोधात गेले अनेक दिवस दिल्लीच्या वेशीवर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या समर्थनार्थ विरोधी पक्षांनी एकत्र येत भारत बंद पाळला होता. या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी विरोधी पक्षाचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटले. या आंदोलनावरून सध्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. सत्ताधारी नेते या आंदोलनासाठी विरोधी पक्षांना जबाबदार धरत आहेत, तर विरोधी पक्षातील नेतेमंडळी कायदे मागे घेण्याच्या शेतकऱ्यांच्या मागणीला पाठिंबा देताना दिसत आहेत. या साऱ्या प्रकरणात कुस्तीपटू आणि भाजपा नेत्या बबिता फोगाट हिने उडी घेतली.

बबिता फोगाट हिने ऑगस्ट २०१९मध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून ती विविध राजकीय मुद्द्यांवर सातत्याने मतप्रदर्शन करताना दिसली आहे. बबिता फोगाटने हे आंदोलन तुकडे-तुकडे गँगने हायजॅक केल्याचे वादग्रस्त ट्विट केलं. “आता असं वाटू लागलंय की शेतकरी आंदोलन हे तुकडे तुकडे गँगने हायजॅक केलं आहे. मी सगळ्या शेतकरी बांधवांना हाथ जोडून विनंती करते की त्यांनी कृपया आपापल्या घरी परत जावं. पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीही शेतकऱ्यांचे हक्क डावलणार नाहीत. काँग्रेस आणि डाव्या पक्षांतील नेतेमंडळी कधीही शेतकऱ्यांचं भलं करू शकत नाहीत”, असे ट्विट तिने केले.

आणखी वाचा- शेतकरी आंदोलनावरुन नितीन गडकरींचं मोठं विधान; म्हणाले…

आणखी वाचा- शेतकरी आंदोलनावरुन रिलायन्सचे गंभीर आरोप; एअरटेल आणि VI वर कारवाईची मागणी

बबिताच्या आधी भाजपाचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही या आंदोलनाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. “सध्या सुरू असलेलं आंदोलन हे शेतकऱ्यांचं आंदोलन नाही. याच्या पाठीमागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. या देशामध्ये पहिल्यांदा मुस्लीम समाजाला उचकवलं आणि सांगितलं सीएए आणि एनआरसीमुळे मुस्लिमांना देशातून बाहेर जावं लागेल. पण एखादा तरी मुसलमान बाहेर गेला का? ते षडयंत्र यशस्वी होणार नाही समजल्यावर आता शेतकऱ्यांना उचकवलं जात आहे. सरकार तुम्हाला तोट्यात घालत असल्याचं शेतकऱ्यांना सांगितलं जात आहे. हे बाहेरच्या देशाचं षडयंत्र आहे. आपल्या देशातील शेतकऱ्यांनी याचा विचार केला पाहिजे,” असं केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले होते.