बॉलिवूडमधील अनेक मोठ्या व्यक्तींचा पाकिस्तान आणि तेथील गुप्तचर यंत्रणेशी संबंध असल्याचा खळबळजनक दावा भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बैजयंत जय पांडा यांनी केला आहे. बुधवारी पांडा यांनी ट्विवटरवरुन यासंदर्भातील ट्विट केलं. या ट्विटमध्ये त्यांनी बॉलिवूडमधील व्यक्तींचे पाकिस्तान आणि आयएसआयशी संबंध असल्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचेही म्हटले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी कोणात्याही व्यक्तीचे नाव घेतले नसले तरी या वरुन आता चर्चांना उधाण आलं आहे.
काय म्हटलं आहे ट्विटमध्ये
पांडा यांनी ट्विटवरुन बॉलिवूडमधील व्यक्तींचे पाकिस्तान आणि आयएसआयच्या व्यक्तींशी व्यक्तीगत आणि व्यवसायिक संबंध असल्याचे म्हटले आहे. “बॉलिवूडमधील काही व्यक्तींचा काश्मीरमध्ये हिंसा पसरवणाऱ्या तसेच अनिवासी भारतीयांसोबत वैयक्तीक संबंध आहेत. हे संबंध दाखवणारे काही कागदपत्रं मी पाहिली. काश्मीरमध्ये हिंसा पसरवण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या पाकिस्तान आणि आयएसआयशी असलेले संबंध यामधून उघड होत आहेत. मी बॉलिवूडमधील देशभक्तांना आवाहन करतो की अशा लोकांबरोबर त्यांनी काम करु नये,” असं पांडा यांना ट्विटमध्ये म्हटलं आहे.
Came across shocking threads documenting personal & business links of some Bollywood personalities with certain Pakistanis & NRIs with undeniable track record encouraging violence in J&K, who have verifiable links to ISI & Pak army. I urge patriotic Bollywoodies to renounce them.
— Baijayant Jay Panda (@PandaJay) July 22, 2020
जय पांडा यांनी केलेल्या या ट्विटमुळे आता सोशल मिडियावर नव्या चर्चांना उधाण आलं आहे. पांडा यांच्य ट्विटवर अनेकांनी आपली मते नोंदवली आहेत. अनेकांनी जर पुरावे मिळाले असतील तर त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. जय पांडा यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतानाही हा दावा केला आहे.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. घराणेशाही वादावरुन बॉलिवूडमध्येच दोन गट पडल्याचे चित्र दिसत आहे. काहीजण घराणेशाहीला समर्थन करताना दिसत आहेत तर काही जणांनी घराणेशाहीला विरोध केला आहे. सुशांतच्या आत्महत्येमागे घराणेशाहीमुळे त्याला डावलण्यात आल्याने आलेल्या तणावाचे कारण असल्याचा दावा त्याच्या चाहत्यांकडून केला जात आहे. याचदरम्यान पांडा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता पुन्हा एकदा नवा वाद सुरु होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांनी बॉलिवूडमधील अनेक व्यक्तींची चौकशी केली आहे. सध्या मुंबई पोलीस सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 23, 2020 7:40 am